पुणे – आयपीएल 2022 शेवटच्या टप्प्यात आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी अंतिम फेरी गाठली आहे. विजेतेपदाचा सामना २९ मे (रविवार) रोजी होणार आहे. या सामन्यानंतर, एक पुरस्कार सोहळा होईल, ज्यामध्ये चॅम्पियन संघ आणि अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला बक्षीस रक्कम दिली जाईल. यासोबतच आणखी अनेक पुरस्कारही देण्यात येणार आहेत.
गतवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएल विजेत्या संघाला 20 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाच्या बक्षीस रकमेतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 12.5 कोटी रुपये होती, ती वाढवून 13 कोटी रुपये करण्यात आली आहे. त्याच वेळी, प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या उर्वरित संघांना (तिसरा आणि चौथा क्रमांक) अनुक्रमे 7 आणि 6.5 कोटी रुपये दिले जातील.
आयपीएल विजेता संघ – 20 कोटी
उपविजेता संघ – 13 कोटी
तिसरा क्रमांक – 7 कोटी
चौथा क्रमांक – 6.5 कोटी
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगच्या 15 व्या आवृत्तीत अनेक अटीतटीचे सामने पाहायला मिळाले. यामध्ये अनेक नवे खेळाडूही उदयास आले आणि त्यांचे आयुष्य बदलले. आयपीएलमध्ये खर्च केलेल्या रकमेवरून ही लीग नेहमीच चर्चेत असते. संघांना मिळालेल्या बक्षीस रकमेव्यतिरिक्त, अनेक पुरस्कार देखील दिले जातात. यामध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, फेअर प्ले अवॉर्ड आदी पुरस्कारांचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला या सर्व पुरस्कारांबद्दल आणि त्यात दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांच्या रकमेबद्दल सांगत आहोत.
आयपीएल ऑरेंज कॅप (पारितोषिक रक्कम 15 लाख रू.) : हा पुरस्कार संपूर्ण आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिला जातो.
फेअर प्ले अवॉर्ड (पारितोषिक रक्कम 10 लाख रू.) : हा पुरस्कार संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक शिस्तीने खेळणाऱ्या संघाला दिला जातो.
सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन (पारितोषिक रक्कम 15 लाख रू.) : हा पुरस्कार संपूर्ण आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेल्या फलंदाजाला दिला जातो.
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (पारितोषिक रक्कम 12 लाख रू.) : हा पुरस्कार आयपीएलच्या संपूर्ण हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो.
आयपीएल पर्पल कॅप (पारितोषिक रक्कम 15 लाख रू.) : संपूर्ण आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज हा या पुरस्काराचा विजेता ठरतो.
सर्वाधिक षटकारांचा पुरस्कार (पारितोषिक रक्कम 12 लाख रू.) : हा पुरस्कार मोसमात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाला दिला जातो.