ड्रीम 11 बनले मुख्य प्रायोजक
नवी दिल्ली –आयपीएल स्पर्धेला अखेर मुख्य प्रायोजक मिळाले. ड्रीम 11 कंपनीने हे प्रायोजकतेचे हक्क 222 कोटी रुपयांना मिळवले. या शर्यतीत असलेल्या बायजू व टाटा समूहापेक्षा त्यांनी जास्त रकमेची बोली लावल्याने त्यांना हक्क देण्यात आले, अशी माहिती आयपीएल समितीचे आयुक्त ब्रीजेश पटेल यांनी दिली आहे.
चीनविरोधात देशात असंतोष वाढल्याने त्यांच्या व्हिवो कंपनीशी असलेला करार बीसीसीआयने मोडला होता व त्यावेळी या स्पर्धेला मुख्य प्रायोजक मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, भारतात क्रिकेटची लोकप्रियता इतकी मोठी आहे की, व्हिवोचा करार संपुष्टात आणला गेल्यावर अनेक कंपन्यांनी या शर्यतीत भाग घेतला.
करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा यंदा भारताबाहेर अमिरातीत येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होत आहे. व्हिवोकडे आपयीएलच्या मुख्य प्रायोजकतेचे हक्क 2018 ते 2022 अशा पाच वर्षांसाठी होते. मात्र, चिनी कंपनीशी करार नको, अशी भावना देशात वाढीस लागल्याने अखेर बीसीसीआयला देखील जनमानस विचारात घ्यावे लागले व हा करार संपुष्टात आणावा लागला.
व्हिवोकडून बीसीसीआयला दरवर्षी 440 कोटी रुपये करारानुसार मिळत होते. त्यांच्याशी असलेला एकूण करार 2 हजार 199 कोटी रुपयांचा होता. यावेळी करोनामुळे अनेक उद्योगांना फटका बसल्याने इतकी रक्कम द्यायला कोणतीही कंपनी पुढे येणार नाही अशीच परिस्थिती होती. ड्रीम 11 ने जरी हे हक्क मिळवले असले तरी त्यांना व्हिवोपेक्षा जवळपास अर्ध्या रकमेत प्रायोजकता मिळवली आहे. बीसीसीआयला देखील मोठ्या रकमेवर पाणी सोडावे लागले असून जे मिळत आहे त्यात धन्यता मानावी लागली आहे.