मुंबई – आयपीएलच्या 15 व्या हंगामाबद्दल असे म्हटले जात होते की, हा आतापर्यंतचा सर्वोत्तम हंगाम असेल. स्पर्धेत संघाची संख्या वाढल्याने सामन्यांची संख्या वाढली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि अधिकृत ब्रॉडकास्टर यांना संघांची संख्या वाढल्यामुळे सामने अधिक रोमांचक होतील अशी अपेक्षा होती. तसेच ही स्पर्धा प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत सर्व विक्रम मोडेल, असे मानले जात होते, मात्र तसे काही घडले नाही. गेल्या काही हंगामाच्या तुलनेत यावेळी टीव्ही रेटिंग आणि व्ह्यूअरशिपमध्ये घट झाली आहे.
दरवर्षी आयपीएल सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात टीव्ही रेटिंग आणि व्ह्यूअरशिपशी संबंधित डेटा समोर येतो. त्यामुळे पुढे स्पर्धा कशी होणार हे समजणे सोपे जाते. वारंवार प्रोमो आणि जाहिराती असूनही, यावेळी रेटिंग आणि व्ह्यूअरशिपमध्ये घट झाली आहे. आयपीएल नेहमीच टीव्ही रेटिंग आणि प्रेक्षकसंख्येमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी करत आहे.
टीव्ही रेटिंग आणि प्रेक्षकसंख्येचे काय झाले…?
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2022 च्या हंगामातील पहिल्या आठ सामन्यांमध्ये टीव्हीचे रेटिंग 2.52 होते. 2021 मध्ये ते 3.75 इतके होते. यावेळी 33 टक्के घट झाली आहे. ( IPL TV ratings decline 33% in opening week ) यापूर्वी 2020 मध्ये टीव्हीचे रेटिंग 3.85 होते.
- केवळ रेटिंगच नाही तर व्ह्यूअरशिपही कमी झाली आहे. पहिल्या आठ सामन्यांमध्ये 229.06 दशलक्ष प्रेक्षक होते. गेल्या वर्षी ते 267.7 दशलक्ष होते. यावेळी 14 टक्के घट झाली आहे.
- आयपीएल दरम्यान ब्रॉडकास्टर सहसा बार्क ((Broadcast Audience Research Council) लिस्टमध्ये शीर्षस्थानी असतात, परंतु यावेळी तसे झाले नाही. स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी तिसऱ्या क्रमांकावर आहे. यावरून आयपीएलची जादू पहिल्या आठवड्यात दिसली नाही हे सिद्ध होते.
मीडिया राइट्सवर होणार परिणाम
आगामी 2023 ते 2027 या पाच मोसमासाठी प्रक्षेपण (मीडिया राइट्स) हक्कांसाठी निविदा बीसीसीआयने मागवल्या आहेत. या संपूर्ण व्यावहारात तब्बल 50 हजार कोटी मिळतील, अशी अपेक्षा बीसीसीआयला आहे. यंदा या हक्कांसाठीचा लिलाव पहिल्यांदाच ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. या लिलाव प्रक्रियेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे.
मात्र, यावेळी टीव्ही रेटिंग आणि व्ह्यूअरशिपमध्ये घट झाल्याने प्रक्षेपणाच्या हक्कासाठी बोली लावणारे नवीन डेटा देखील विचारात घेतील आणि त्याचा परिणाम माध्यम हक्कांच्या विक्रीवर होऊ शकतो. त्यामुळे बीसीआयचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत डिस्ने स्टार, टीव्ही18-व्हायकॉम (स्पोर्ट्स-18), अॅमेझॉन, झी आणि सोनी या पाच मोठ्या गटांनी निविदांसाठी डॉक्यूमेंट खरेदी केली आहेत.