“आयपीएल’ बनला सट्ट्याचा खेळ

पोलिसांची करडी नजर
महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्माला भाव

बेईमानी का धंदा पुरी इमानदारी से …

अनेकदा लोक हातउसने किंवा कर्ज घेतलेले पैसे फेडत नाहीत, पण इकडे सट्ट्याच्या खेळात मात्र मोठी इमानदारी दिसून येते. सट्ट्यावर लावलेली रक्कम दुसऱ्या दिवशी द्यावीच लागते. जिंकलेली रक्कमही संबंधित बुकी दुसऱ्या दिवशी त्या व्यक्‍तीला पोहोच करत असतो. मोबाइल घेऊन बसलेले लोक सट्टा लावून घेतात आणि प्रत्येकाचा हिशेब ठेवतात. माऊथ पब्लिसिटीतून सट्टा घेणाऱ्याची माहिती पसरवली जात आहे. 29 मार्च रोजी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार जणांना अटक केली होती. 1 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला होता. मात्र, पोलिसांच्या या कारवाईनंतरही सट्टेबाजीचे दुकान बंद झालेले नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

पिंपरी – धोनी 50 रन काढणार, आर. अश्‍विन विकेट घेणार बघ..! नाही रे चल लाव पाचशे… माझे हजार घे..! आज चेन्नईवर काय भाव आहे? आज चेन्नईचं जिंकणार. लाव पैसे चेन्नईवर…असा संवाद आता पिंपरी-चिंचवड शहरातील कॉलनी, चहाच्या टपऱ्या आणि चौका-चौकांतून ऐकू येत आहेत. मनोरंजनाच्या दृष्टीने सुरू झालेली आयपीएलची वाटचाल आता सट्ट्याचा मुख्य खेळ म्हणून सुरू आहे. आयपीएलच्या या सट्ट्यात महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना सर्वाधिक भाव असल्याचे समोर आले आहे.

मागील काही वर्षांपासून अनेक तरुण मुले आयपीएलच्या क्रिकेट मॅच पाहण्याच्या नावाखाली सट्ट्याकडे वळत आहेत. आपल्या मुलाला क्रिकेटची आवड आहे, म्हणून पालकही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र, सध्या पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच परिसरात आयपीएलच्या सट्टेबाजीने घट्ट पाय रोवले असल्याचे दिसत आहे. या सट्टेबाजीत शहरातील तरुण मुलांसह नोकरदार वर्गही गुंतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयपीएलच्या या सट्टेबाजीमध्ये 1 हजार रुपयांपासून 10 हजार रुपयापर्यंत आणि 10 हजार रुपयांपासून लाखो रुपयांवर सट्टा लावून जास्तीचे पैसे कमवण्याचे आमिष तरुण पिढीला लागत आहे. पैशांसोबत आपण क्रिकेट या खेळाचे किती तज्ज्ञ आहोत? असा गोड गैरसमज त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतो.

याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीयरित्या या सर्व बाबींचा अहवाल बनवला जातो. यापूर्वी देखील कित्येकदा पिंपरी-चिंचवड शहरातून सट्टा लावणाऱ्यांना पकडण्यात आले आहे. या क्षेत्रातील सराईंतावर अजूनही पोलिसांनी नजर आहे. याबाबत ठोस माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर छापे टाकण्यात येतात.
यात सर्व वयोगटाचे लोक आहेत. काही जण तर व्यसनाधीन झाले आहेत. त्याला सट्टेबाजी खतपाणी घालत आहे. या मौसमात सर्वाधिक भाव खाणारी टीम चेन्नई सुपरकिंग्ज आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा. या टीमसोबतच केकेआर, पंजाब, आरसीबी, हैद्राबाद या संघांच्या सामन्यादरम्यानही कोट्यावधी रुपयाचा सट्टा लावला जात आहे. बुधवारी झालेल्या मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात मोठ्या प्रमाणात सट्टा लावला गेल्याची माहिती मिळत आहे. टीमसोबतच खेळाडू किती रन किंवा विकेट घेणार यावरही सट्टा लावला जात आहे. मॅचमधील रोमांचासोबतच सट्ट्याचा आकडाही वाढत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.