IPL 2025: क्रिकेट चाहते आयपीएल सुरू होण्याची वाट पाहत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपल्यानंतर काही दिवसातच आयपीएलला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील बैठकीनंतर बोलताना BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी IPL 23 मार्चपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. मात्र, आता आयपीएलची तारीख बदलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
रिपोर्टनुसार, इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 18व्या हंगामाची सुरुवात 22 मार्चपासून होण्याची शक्यता आहे. आयपीएल 2025चा पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये खेळला जाईल. हा सामना कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) या संघात पार पडणार आहे. केकेआर 17व्या हंगामाचे विजेते आहेत. त्यामुळे यावेळेस आयपीएलची सुरुवात त्यांच्या घरच्या मैदानापासून होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीचा उपविजेता संघ सनरायझर्स हैदराबाददेखील आपल्या घरच्या मैदानावर पहिला सामना खेळणार आहे. रविवार, 23 मार्चला उप्पल येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये त्यांचा पहिला सामना राजस्थान रॉयल्ससोबत असेल. हा सामना दुपारी खेळला जाईल.
जुन्या परंपरेनुसार फायनलचे आयोजन देखील विजेत्या संघाच्या शहरात केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल 2025चा अंतिम सामना रविवार, 25 मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये खेळला जाऊ शकतो. या हंगामातील सामने अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, लखनौ, मुल्लांपूर, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद आणि जयपूर यासह गुवाहाटी आणि धर्मशाला येथेही खेळवले जातील. दरम्यान, बीसीसीआयकडे पुढील काही दिवसात आयपीएलचे अधिकृत वेळापत्रक जारी केले जाण्याची शक्यता आहे.