IPL Auction 2025 : आयपीएल मेगा लिलावापूर्वीची तयारी जोरात सुरू आहे. आयपीएल संघांनी सातत्याने आपली रणनीती बदलण्यास सुरुवात केली आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात हा मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि युझवेंद्र चहल सारखे मोठे भारतीय खेळाडू या लिलावाचा भाग असतील.
याशिवाय विदेशी खेळाडूंमध्ये जॉस बटलर, फिल सॉल्ट, क्विंटन डी कॉक, मिचेल स्टार्क आणि जोफ्रा आर्चर या नावांचा समावेश आहे. आज आपण त्या विदेशी खेळाडूबद्दल बोलणार आहोत ज्याच्यावर IPL मेगा लिलावात सर्वात मोठ्या रक्कमेची बोली लागू शकते.
आयपीएल मेगा लिलावात दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू गेराल्ड कोएत्झीवर (Gerald Coetzee) पैशांचा वर्षाव होऊ शकतो. या खेळाडूला लिलावात चांगली रक्कम मिळू शकते. गेराल्ड कोएत्झी फलंदाजीसोबतच भारताविरुद्ध गोलंदाजीतही चमक दाखवत आहे. या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात जेराल्ड कोएत्झीने शेवटच्या षटकांमध्ये महत्त्वपूर्ण 23 धावा केल्या.
यानंतर गोलंदाजीतही 3 बळी घेतले. भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव जवळपास निश्चित वाटत होता, पण यानंतर गेराल्ड कोएत्झी आणि ट्रिस्टन स्टब्सने सामन्याचे चित्र पटलून टाकले. या सामन्यात गेराल्ड कोएत्झीने 9 चेंडूत दोन चौकार आणि एक उत्तुंग षटकारासह 19 धावा केल्या होत्या. तसेच 1 भारतीय फलंदाजाला आपला बळी बनवले. या दोन सामन्यात त्यानं “तो एक वेगवान गोलंदाज आहे, तसेच फलंदाजीतही कमाल करू शकतो हे दाखवून दिलं आहे.
दरम्यान, गेराल्ड कोएत्झी आयपीएल 2024 मध्ये खेळला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली तो मुंबई इंडियन्सचा एक भाग होता. मात्र, आता मुंबई इंडियन्सने जेराल्ड कोएत्झीला सोडले आहे. गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सने जेराल्ड कोएत्झीचा 5 कोटी रुपयांना समावेश केला होता. यंदा आयपीएल मेगा लिलावात त्याने बेस प्राईस 2 कोटी रुपये ठेवली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी बोली या किंमतीपासूनच लागणार आहे.
IPL 2025 Mega Auction : सीएसके लावू शकते अँडरसनवर बोली – मायकेल वॉन
गेराल्ड कोएत्झीने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून 10 सामन्यांत 13 विकेट घेतल्या होत्या. मात्र, यावेळी आयपीएल मेगा लिलावात गेराल्ड कोएत्झीवर कोणता संघ बोली लावणार आणि आपल्या संघात सामील करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेराल्डची भारताविरूध्द पहिल्या दोन टी-20 सामन्यातील खेळी पाहता दुहेरी भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज आपल्या ताफ्यात असावा असं कोणाला वाटणार नाही. त्यामुळे गेराल्ड या लिलावात चांगलाच भाव खाऊन जाणार आहे.