6 rules in IPL 2025 that are not in international cricket : आयपीएल २०२५ च्या हंगामाला २२ मार्चपासून सुरु होत आहे. या हंगामातील पहिला सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. या हंगामाला अधिक रोमांचक बनवण्यासाठी, बीसीसीआयने अनेक नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांमध्ये प्रत्येक सामन्यात जीवंतपणा आणण्याची ताकद आहे.
आयपीएल २०२५ मधील हे नवीन नियम केवळ खेळ अधिक मनोरंजक बनवणार नाहीत तर संघांना नवीन रणनीती तयार करण्यास देखील प्रेरित करतील. मनोरंजक गोष्ट म्हणजे आयपीएलच्या या नियमांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी काहीही संबंध नाही. आयपीएल २०२५ मधील असे ६ नियम कोणते आहेत, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू नाहीत ते जाणून घेऊया.
ओव्हर-रेट डिमेरिट पॉइंट सिस्टम –
आयपीएल २०२५ मध्ये स्लो ओव्हर-रेटसाठी कर्णधारांवर बंदी घालण्याऐवजी डिमेरिट पॉइंट सिस्टम लागू केली जाईल. हे गुण तीन वर्षे जमा होत राहतील. हा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा वेगळा आहे, जिथे कर्णधारांना स्लो ओव्हर-रेटसाठी दंड आकारला जातो.
स्ट्रॅटेजिक टाइम-आउट –
आयपीएलमध्ये, प्रत्येक डावात दोन स्ट्रॅटेजिक टाइम-आउट असतात, ज्यामुळे संघांना रणनीती तयार करण्याची संधी मिळते. क्षेत्ररक्षण करणारा संघ ६-९ षटकांच्या दरम्यान आणि फलंदाजी करणारा संघ १३-१६ षटकांच्या दरम्यान टाइम-आउट घेऊ शकतो. हे स्वरूप आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांपेक्षा वेगळे आहे, जिथे फक्त ड्रिंक्स ब्रेकची परवानगी आहे.
लाळेवरील बंदी हटवली –
आयपीएल २०२५ मध्ये लाळ लावण्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. ही बंदी कोविड-१९ महामारी दरम्यान लागू करण्यात आली होती, ज्यामध्ये खेळाडूंना रिव्हर्स स्विंग मिळविण्यासाठी चेंडूवर लाळ लावण्याची परवानगी नव्हती. परंतु, आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ही बंदी अजूनही लागू आहे.
इम्पॅक्ट प्लेअर नियम –
२०२३ पासून आयपीएलमध्ये संघांना “इम्पॅक्ट प्लेअर्स” वापरण्याची परवानगी आहे. या नियमानुसार संघांना सामन्यादरम्यान उपलब्ध असलेल्या ११ खेळाडूंव्यतिरिक्त एक अतिरिक्त खेळाडू खेळवण्याची परवानगी आहे. तथापि, या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंची भूमिका कमी होऊ शकते. ही सुविधा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उपलब्ध नाही.
वाइड बॉलसाठी हॉक-आय तंत्रज्ञान –
या हंगामात, आयपीएलमध्ये ऑफसाइड आणि हेड-हाई वाइड बॉल निर्णय घेण्यासाठी हॉक-आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. हे तंत्र आधीच कंबरेच्या उंचीवर असलेल्या नो बॉलसाठी वापरले जात होते. हा बदल फक्त आयपीएलसाठी आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरला जात नाही.
दुसऱ्या नवीन चेंडूचा वापर –
रात्रीच्या सामन्यांमध्ये दुसऱ्या डावात दवाचा फायदा कमी करण्यासाठी आयपीएल २०२५ मध्ये दुसरा नवीन चेंडू वापरला जाईल. हा बदल फक्त आयपीएलसाठी आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो लागू करण्याची कोणतीही योजना नाही.