नवी दिल्ली – आयपीएल 2023 शेवटच्या टप्प्यावर आहे, अश्यातच आजचा 68 वा सामना ‘कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स’ यांच्यात होणार आहे. ईडन गार्डन्सवर होणारा हा सामना लखनौसाठी खास असेल, कारण हा सामना जिंकून त्याला दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची संधी असेल. त्यामुळे त्याला फायनलमध्ये पोहोचण्याच्या 2 संधी मिळतील.
शनिवारचा हा दुसरा सामना संध्याकाळी साडेसातपासून सुरू होईल. कर्णधार म्हणून नितीश राणा (केकेआर) आणि कृणाल पांड्या (एलएसजी) आमनेसामने असतील. या मैदानावर या मोसमात आतापर्यंत 6 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 3 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.
दरम्यान, कोलकाता संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम असली तरी, केकेआर संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आजच्या सामन्याच्या निकालावर प्लेऑफच्या शर्यतीत असणाऱ्या संघांचं भविष्यही अवलंबून आहे. आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघामध्ये दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये लखनौ संघाचं पारड जड ठरल्याचं पाहायला मिळालं आहे.