चेन्नई :पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव करून थाटात फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. त्याचबरोबर चेन्नईने 10 व्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.आता गुजरातचा सामना हा एलिमिनेटरच्या विजेत्या संघासोबत होईल.
चेन्नईने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाला 20 ओव्हरमध्ये 157 धावाच करता आल्या. शुभमन गिलने सर्वाधिक 42 धावा केल्या तर राशिद खान 30 धावावर बाद झाला. या दोघांशिवाय गुजरातच्या इतर कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
चेन्नईकडून दीपक चहर, महीश तीक्षणा, रवींद्र जडेजा आणि पथिराणा यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर तुषार देशपांडेला एक विकेट घेण्यात यश आलं.
तत्पूर्वी, या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, यानंतर चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 7 बाद 172 पर्यंत मजल मारली. ऋतुराज गायकवाडने 60 तर डेवॉन कॉनवेने 40 धावांची खेळी केली. गायकवाड आणि कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची पार्टनरशीप केली. त्यानंतर रवींद्र जडेजानेही 22 रनचं महत्त्वाचं योगदान दिलं.
गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, याशिवाय दर्शन नलकांडे, राशिद खान आणि नूर अहमद यांनी 1-1 विकेट घेतली.