नवी दिल्ली : आयपीएल 2022 ची सुरुवात आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जसाठी भयानक झाली आहे. चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल 2022 स्पर्धेच्या सुरुवातीपासून सर्व 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्जसाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर पुन्हा एकदा जखमी झाला आहे. दुखापतीनंतर दीपक चहर आयपीएल 2022 च्या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो.
दीपक चहरला यावर्षी चेन्नई सुपर किंग्जने 14 कोटी रुपयांना विकत घेतले होते, पण दीपक चहरला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दुखापत झाली. चहर तंदुरुस्त होऊन आयपीएलच्या मध्यावर पुनरागमन करेल, अशी आशा चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला होती, पण आता ते अवघड दिसत आहे. दीपक सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) असून दुखापतीतून सावरण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. एका स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, दीपक चहरला पाठीच्या जुन्या दुखापतीमुळे पुन्हा त्रास होत असल्याची माहिती मिळाली आहे.
दीपक या आठवड्याच्या शेवटी चेन्नई सुपर किंग्ज संघात सामील होणार होता. पण आता दुखापतीची समस्या पुन्हा समोर आल्यानंतर तो संपूर्ण आयपीएल 2022 मधून बाहेर होऊ शकतो. भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात या वर्षी फेब्रुवारीमध्ये कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात दीपक चहरला दुखापत झाली होती. यावेळी त्याच्या मांडीच्या स्नायूंना ताण आला होता.