नवी दिल्ली – ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस यांच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज सनरायजर्स हैद्राबाद संघावर ७ गडी राखून सहज विजय मिळवला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या हैद्राबाद संघाने निर्धारित २० षटकांत ३ बाद १७१ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर डेव्हीड वॉर्नरने ५५ चेंडुंत तीन चौकार २ षटकारांच्या मदतीने ५७ धावा फटकावल्या. तर मनिष पांडेने ४६ चेंडूंत पाच चौकार आणि एक षटकारांसह ६१ धावा केल्या. तर केन विल्यम्सनने नाबाद २६ आणि केदार जाधवने नाबाद १२ धावा केल्या. त्यामुळे हैद्राबाद संघाला १७१ धावांपर्यंत मजल मारता आली.
प्रत्युत्तर फलंदाजीला आलेल्या चेन्नई संघाने १८.३ षटकांत ३ बाद १७३ धावा करून विजयाची नोंद केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस यांनी १२९ धावांची सलामी दिली. गायकवाडने ४४ चेंडूंत १२ चौकारांसह ७५ धावा केल्या. तर डुप्लेसीसने ३८ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकारासह ५६ धावा केल्या. त्यानंतर रवींद्र जडेजाने नाबाद ७ आणि सुरेश रैनाने नाबाद १७ धावा करून चेन्नईचा विजय साकार केला.