IPL 2021 : राणा-त्रिपाठी यांची दमदार अर्धशतके; कोलकात्याचा हैद्राबादवर रोमांचक विजय

चेन्नई –  सलामीवीर नितेश राणा आणि राहुल त्रिपाठी यांची शानदार अर्धशतके आणि गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायजर्स हैद्राबादवर 10 धावांनी  विजय मिळवला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित २० षटकांत ७ बाद १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या सनरायजर्स हैद्राबाद संघाला २० षटकांत ५  बाद १७७ धावांपर्यंतच मजल मारता आली.

विजयासाठी १८८ धावांचे खडतर आव्हान घेऊन फलंदाजीला आलेल्या हैद्राबादची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धीमान साहा एकापाठोपाठ बाद झाले. वॉर्नरला शकीब अल हसनने तर साहाला प्रसिद्ध कृष्णाने बाद केलं. दरम्यान तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मनिष पांडे आणि जॉनी बेअरस्ट्रो यांनी हैद्राबादचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचली. बेअरस्ट्रो ४० चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५५ धावा करून बाद झाला. त्यानंतर मोहम्मद नबीने (१४) मनिष पांडेला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर बाद झाला. पाडेंने एकाकी झुंज देत अर्धशतक झळकवले. मात्र दुसऱ्या बाजुला असलेला विजय शंकर (११) धावा करून परतला.  अब्दुल समदने (नाबाद १९) धावा केल्या.  तर पांडेने ४४ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ६१ धावा केल्या. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात पांडेला अपयश आलं.

कोलकाताकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन विकेट घेतल्या. तर शकीब अल हसन, आंद्रे रसल आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

तत्पूर्वी नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या कोलकाता संघाने आक्रमक सुरुवात केली. नितेश राणा आणि शुभमन गिलने जोडीने ७ षटकांत ५३ धावांची सलामी दिली. मात्र फिरकीपटू राशिद खानने गिलला बाद करत सलामीजोडी तोडली. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीने राणाला सुरेख साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. राहुलने अर्धशतक पूर्ण केले. त्याने २९ चेंडूत ५ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याला टी. नटराजनने तंबूत धाडले. मात्र राणाने धडाकेबाज फलंदाजी करत धावफलक हालता ठेवला. त्याने ५६ चेंडूत चार षटकार आणि ९ चौकार लगावत ८० धावा केल्या. मोहम्मद नबीच्या चेंडूवर तो बाद झाला.

दरम्यान इयॉन मॉर्गन (2) आणि आंद्रे रसेल (5) झटपट बाद झाले. त्यानंतर दिनेश कार्तिकने नाबाद 22 धावा केल्या. तर शकीब अल हसनने (3) धावा केल्या. हैद्राबादकडून मोहम्मद नबी आणि राशीद खान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.