IPL 2021 : राहुलचे अर्धशतक; पंजाबचा मुंबईवर एकतर्फी विजय

चेन्नई – गोलंदाजांची अचूक कामगिरी आणि कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट सामन्यात मुंबई इंडियन्स संघावर ९ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्स संघाला निर्धारित २० षटकांत ६ बाद १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रत्युत्तर पंजाब किंग्स संघाने १७.४ षटकांत १  बाद १३२ धावा करून विजयाची नोंद केली. यामध्ये लोकेश राहुलने ५२ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकारासह ६० धावा केल्या. मुंबईकडून राहुल चहरने एक विकेट घेतली. 

विजयासाठी १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला लोकेश राहुल आणि मयंक अग्रवालने ५३ धावांची सलामी दिली. मयंक २५ धावा करून बाद झाल्यानंतर लोकेश राहुल आणि ख्रिस गेलने नाबाद ४३ धावा करून विजयाची नोंद केली.

तत्पूर्वी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. क्विंटन डीकॉक (३) आणि इशान किशन (६) झटपट बाद झाले. दरम्यान रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमार ३३ धावा करून बाद झाल्यानंतर रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली. रोहितने ५२ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. तर केरॉन पोलार्डने नाबाद १६ धावा केल्या. त्यामुळे मुंबईला १३१ धावा करता आल्या.

पंजाबकडून मोहम्मद शमी आणि रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अर्शदीप सिंग आणि दीपक हुड्डा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.