मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील अकराव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने किंग्स इलेव्हन पंजाविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
आयपीएल स्पर्धेत धडाक्यात प्रारंभ करणारा दिल्ली संघ नंतर मात्र ढेपाळला. राजस्थानकडून गुरुवारी नाट्यमय पराभव पत्करल्यानंतर आता आज त्यांची पंजाब किंग्जशी लढत होत आहे. अर्थात पंजाब संघाची कामगिरीही फारशी सातत्यपूर्ण नसली तरीही दिल्लीपेक्षा त्यांची बाजू काहीशी वरचढ वाटत आहे.
दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी पहिल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. मात्र, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हे दोघेही ज्या पद्धतीने बाद झाले ते पाहता या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजीवर ते कसे खेळतात यावर संघाचे यश अवलंबून आहे. शॉ व धवन वगळता अजिंक्य रहाणे, मार्कस स्टोनिस हे प्रमुख फलंदाज फारसे भरात नाहीत.