#IPL 2021 : मुंबईसमोर आज कोलकाताचे आव्हान

चेन्नई  -आयपीएल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगळुरूविरुद्ध पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्सला आझ तुल्यबळ कोलकाता नाईट रायडर्सशी लढत द्यावी लागणार आहे. या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी कोलकाता सज्ज आहे, तर पहिल्या सामन्यातील पराभव विसरून सरस खेळ करण्याचे आव्हान मुंबईसमोर आहे.

मुंबई संघाबाबत बोलायचे झाले तर कोलकाताविरुद्ध त्यांना सरस सलामी मिळणे आवश्‍यक आहे. त्यांच्या फलंदाजीची ताकद कोलकातापेक्षा वरचढ वाटत असली तरीही या फलंदाजांना सातत्य राखता आलेले नाही हे देखील तितकेच खरे आहे. गोलंदाजी त्यामानाने जास्त सरस आहे. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह भरात असून त्याच्या भात्यात असलेला इनस्विंगरही चांगलाच यशस्वी ठरत आहे. याच चेंडूवर पहिल्या सामन्यात त्याने विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला होता.

मात्र, कोलकात्यावर मात करण्यासाठी त्यांना केवळ बुमराहच्याच गोलंदाजीवर अवलंबून राहून चालणार नाही. कृणाल पंड्या व राहुल चहर यांनादेखील त्यांच्यावरील जबाबदारीचे भान ठेवून कामगिरी करावी लागणार आहे. फलंदाजीबाबत बोलायचे झाले तर कर्णधार रोहित शर्मा, कॅरन पोलार्ड व हार्दिक पंड्या चांगल्या सुरुवातीनंतर अत्यंत बेजबाबदार पद्धतीने बाद होत आहेत. त्यांनीही सामन्याचे गांभीर्य ओळखून खेळ केला पाहिजे तरच मुंबईला मोठी धावसंख्या उभारणे शक्‍य होणार आहे. ख्रिस लीन, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनीच धावांचे सातत्य राखले आहे. त्यांनाच आजच्या सामन्यातही कोलकाताविरुद्ध सरस कामगिरी करावी लागणार आहे.

दुसरीकडे कोलकाताबाबत बोलयचे झाले तर कर्णधार इयान मॉर्गनसह दीनेश कार्तिक, सुनील नरेन, नितीश राणा, शकिब अल हसन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी व पवन नेगी अशी भक्कम फलंदाजी कोलकाताकडे आहे. मात्र, नरेन, मॉर्गन, त्रिपाठी, कार्तिक व राणा यांच्याकडूनच मोठ्या खेळीची गरज आहे. त्यांची गोलंदाजीही फारशी अनुभवी नाही. त्यांचा रसेल, पॅट कमिन्स व प्रसिध कृष्णा यांच्यावर मुंबईच्या तगड्या फलंदाजांना रोखण्याचे
आव्हान असेल.

अष्टपैलूंवरच मदार
या सामन्यात दोन्ही संघांकडे प्रचंड अनुभव असलेले अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांच्याकडून फलंदाजी व गोलंदाजीत सातत्यपूर्ण सरस कामगिरीची अपेक्षा आहे. मोठे फटके खेळण्याची या खेळाडूंची क्षमता असून या सामन्यात किमान द्विशतकी धावसंख्या उभारण्यात एखाद्या संघाला यश आले तर धावांचा पाठलाग पाहणेही पर्वणीच असेल.

सामन्याची वेळ
सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः एम. ए. चिदम्बरम स्टेडियम, चेन्नई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्टसवर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.