अहमदाबाद : गोलंदाजांचा भेदक मारा आणि फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्स संघावर ५ गडी राखून सहज विजय मिळवला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाला निर्धारित २० षटकांत ९ बाद १२३ धावापर्यंतच मजल मारता आली. यामध्ये मयंक अग्रवालने सर्वाधिक ३१ तर ख्रिस जॉर्डनने ३० धावा केल्या. तर इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. कोलकात्याकडून प्रसिद्ध कृष्णाने ३विकेट घेतल्या. तर सुनील नारायण आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
प्रत्युत्तरात कोलकाता संघाने १६.४ षटकांत ५ बाद १२६ धावा करून विजयाची नोंद केली. यामध्ये राहुल त्रिपाठीने ४१ धावा केल्या. तर इयॉन मॉर्गनने नाबाद ४७ धावा करून कोलकाताचा विजय साकार केला.