नवी दिल्ली – अरुण जेटली स्टेडियमवर झालेलया सामन्यात राजस्थानने दिलेल्या 221 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैद्राबादला 20 षटकात 8 बाद 165 धावाच करता आल्या. त्यामुळे राजस्थानने 55 धावांनी विजय मिळवला. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी 221 धावांचा बचाव करताना शिस्तबद्ध मारा केला. त्यांनी नियमित अंतराने विकेट्स घेतल्याने हैद्राबादच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावता आले नाही. त्यांच्याकडून सलामीवीर मनीष पांडेने सर्वाधिक 31, तर जॉनी बेअरिस्टोने 30 धावांची खेळी केली. राजस्थानकडून मुस्तफिझुर रहमान आणि ख्रिस मॉरिस यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, हैदराबाद संघाचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत राजस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानकडून सलामीला जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी चांगली सुरुवात केली. मात्र, जयस्वाल 12 धावा करुन राशिद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने बटलरची भक्कम साथ दिली. या दोघांनी मिळून राजस्थानला 150 धावांचा टप्पा पार करुन दिला. या दोघांमध्ये दिडशे धावांची भागीदारी रंगली असतानाच 17व्या षटकात विजय शंकरने संजू सॅमसनला 48 धावांवर बाद केले.
दुस-या बाजूने बटलरने आपली आक्रमक खेळी सुरू ठेवली. त्याने 17व्या षटकात 56 चेंडूत शतकी खेळी केली. आयपीएलमध्ये शतक करणारा तो चौथा इंग्लंडचा खेळाडू ठरला. तो शतकानंतरही आक्रमक खेळत होता. पण अखेर 19व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर संदीप शर्माने त्याला त्रिफळाचीत केले. तोपर्यंत राजस्थानने 200 धावांचा टप्पा ओलांडला होता. बटलरने 64 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांसह 124 धावांची खेळी केली. अखेर रियान पराग आणि डेव्हिड मिलरने राजस्थानला 220 धावांपर्यंत पोहचवले.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 3 बाद 220 (जोस बटलर 124, संजू सॅमसन 48, रियान पराग नाबाद 15. रशिद खान 1-24, संदिप शर्मा 1-50). सनरायर्जस हैद्राबाद – 20 षटकांत 8 बाद 165 (मनिष पांडे 31, जॉनी बेअरिस्टो 30, केदार जाधव 19, भुवनेश्वर कुमान नाबाद 14. मुस्तफिझुर रहमान 3-20, ख्रिस मॉरिस 3-29)