चेन्नई – इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून सनरायजर्स हैदराबादने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात यंदाच्या आयपीएलचा आज पहिला सामना होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांची फलंदाजी तोडीस तोड आहे. दोन्ही संघात आक्रमक फलंदाजांचा भरणा असल्याने हा सामना रोमहर्षक होण्याची अपेक्षा आहे.
हैदराबादच्या संघाबाबत बोलायचे झाल्यास कर्णधार डेव्हिड वॉर्नरवरच फलंदाजीचा 80 टक्के वाटा उचलण्याची जबाबदारी आहे. अर्थात, गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या स्पर्धेत त्यांची फलंदाजी जास्त सरस दिसण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे कोलकाताच्या संघाची फलंदाजी हैदराबादपेक्षाही सरस आहे. त्यांच्याकडे शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंग, करुण नायर, सुनील नरीन, दिनेश कार्तिक व इयान मॉर्गन अशी तगडी फलंदाजी आहे. त्यातही त्रिपाठी, गिल व मॉर्गन हे सध्या भरात असल्याने हैदराबादच्या गोलंदाजांना त्यांना रोखण्याचेच आव्हान पेलावे लागणार आहे.