IPL 2021 : डुप्लेसीस, ऋतुराजची स्फोटक अर्धशतके; चेन्नईचा कोलकात्यावर शानदार विजय

मुंबई – फाफ डुप्लेसीस आणि ऋतुराज गायकवाड यांची स्फोटक अर्धशतके आणि दीपक चहरची भेदक गोलंदाजी यामुळे चेन्नई सुपरकिंग्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघावर १८ धावांनी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई संघाने निर्धारित २० षटकांत ३ बाद २२० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तर कोलकाता संघाला १९.१ षटकांत सर्वबाद २०२ धावांपर्यंतच मजल मारता आली.

विजयासाठी २२१ धावांचे खडतर आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाताचे आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. शुभमन गिल (०), नितीश राणा (९), राहुल त्रिपाठी (८), इयॉन मॉर्गन (७) आणि सुनील नारायण यांना दुहेरी धावसंख्या देखील गाठता आली नाही. मात्र दिनेश कार्तीक आणि आद्रे रसेल यांनी ८१ धावांची भागीदारी रचली. आंद्रे रसेल सॅम करनच्या चेंडूवर बाद झाला. त्याने २२ चेंडूंत ३ चौकार आणि सहा षटकारांसह ५४ धावा कुटल्या. त्यानंतर कार्तिक (40) बाद झाला. मात्र पॅट कमिन्सने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. त्याने ३३ चेंडूंत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ६५ धावा केल्या. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. चेन्नईकडून दीपक चहरने चार आणि लुंगी निगडीने तीन विकेट घेतल्या.

तत्पूर्वी नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या चेन्नईने आक्रमक सुरुवात केली. मागील तीन सामन्यात अपय़शी ठरलेल्या ऋतुराज गायकवाडला आज लय गवसली. त्याने फाफ डुप्लेसीसच्या साथीत चेन्नईला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी ११५ धावांची सलामी दिली. ऋतुराज ४२ चेंडूंत सहा चौकार आणि ४ षटकारांसह ६४ धावा करून बाद झाला. मात्र डुप्लेसीसने शानदार फलंदाजी करत धावांची गती वाढवली. तर दुसऱ्या बाजुने मोईन अली (२५) आणि महेंद्र सिंग धोनी (१७) बाद झाले. डुप्लेसीसने ६० चेंडूंत ९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ९५ धावा करून संघाची धावसंख्या २०० च्या पार पोहोचवली. तर जडेजाने नाबाद ६ धावा केल्या.

कोलकाताच्या वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.