चेन्नई – आयपीएल टी-२० क्रिकेट लीगमध्ये आज टाय झालेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्स संघाने सुपर ओव्हरमध्ये हैद्राबाद सनरायजर्स संघावर रोमांचक विजय मिळवला. समान धावसंख्या झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा खेळताना हैद्राबाद संघाने 7 धावा केल्या. तर दिल्लीने 8 धावा करून विजयाची नोंद केली.
प्रत्युत्तर हैद्राबाद संघाने २० षटकांत ७ बाद १५९ धावा केल्या. यामध्ये केन विल्यम्सनने दमदार खेळी करत नाबाद ६६ धावा केल्या. जॉनी बेअरस्ट्रोने ३८ धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून आवेश खानने तीन आणि अक्षर पटेलने दोन विकेट घेतल्या. तर अमित मिश्राने एक गडी बाद केला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद १५९ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर पृथ्वी शॉने चौफेर फटकेबाजी करताना ३९ चेंडूंत ७ चौकार आणि १ षटकारासह ५३ धावा केल्या. तर शिखर धवनने २८, ऋषभ पतंने ३७ आणि स्टीव्ह स्मिथने नाबाद ३४ धावा केल्या. दिल्लीकडून सिद्धार्थ कौलने दोन विकेट घेतल्या. तर राशिद खानने एक गडी बाद केला.