IPL 2021 – मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज आयपीएलच्या 13 व्या पर्वातील दुसरा सामना चेन्नई सुपरकिंग्ज व दिल्ली कॅपिटल्सदरम्यान रंगला आहे. कर्णधार रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने आज नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी चैन्नईच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात तंबूत परत पाठवले. मात्र यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या मोईन अली व सुरेश रैना यांनी अर्धशतकी भागीदारी करत चैन्नईचा डाव सावरला.
मोईन अली वयक्तिक ३६ धावांवर असताना रविचंद्रन अश्विनचा शिकार ठरला. मोईन अलीनंतर फलंदाजीसाठी आलेल्या अंबाती रायडूसोबत रैनाने ६३ धावांची भागीदारी केली. मात्र रायडूचा मैदानावर जम बसतोय असं वाटत असतानाच टॉम करनने त्याला तंबूचा रास्ता दाखवला. त्यावेळी संघाची धावसंख्या ४ गाड्यांच्या मोबदल्यात १२३ इतकी झाली होती.
यानंतर अर्धशतकी (५४) खेळी केलेला सुरेश रैना धावचीत झाला व त्यापाठोपाठ कर्णधार धोनी आपले खातेही न उघडता बाद झाला. एकापाठोपाठ दोन मोठे धक्के बसल्याने चैन्नईच संघ सन्मानजनक धावसंख्या उभारेल काय? असा प्रश्ननिर्माण झाला होता. मात्र रवींद्र जडेजा व सॅम करन यांनी तडाखेबाज फलंदाजी करत संघाची धावसंख्या निर्धारित २० षटकांमध्ये १८८ पोचवली. जडेजाने १७ चेंडूत ३ चौकारांसह २६ धावा केल्या तर सॅम करनने दिल्लीच्या गोलंदाजांची येथेच्छ धुलाई करत १५ चेंडूत ३४ धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार व २ षटकारांची आतिषबाजी केली.
विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाने शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ३ षटकांमध्ये एकही गडी न गमावता २४ धावा केल्या होत्या. दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ १४ धावांवर तर शिखर धवन १० धावांवर नाबाद आहेत.