IPL 2021 : दीपक चहरचा भेदक मारा; चेन्नईचा पंजाबवर दणदणीत विजय

मुंबई – दीपक चहरची भेदक गोलंदाजी आणि मोईन अलीच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पहिल्या पराभवानंतर चेन्नईने दुसऱ्या सामन्यात विजयाची नोंद केली.

प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाला २० षटकांत ८ बाद १०६ धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रत्युत्तर चेन्नईने १५.४ षटकांत ४ बाद १०७ धावा करून विजयाची नोंद केली. दीपक चहरने ४ षटकांत १३ धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या.

विजयासाठी १०७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (५) आजही अपयशी ठरला. त्यानंतर फाफ डुप्लेसी आणि मोईन अली यांनी ६६ धावांची भागीदारी केली. मोईन अलीने ३१ चेंडूंत ७ चौकार आणि एक षटकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. तर सुरेश रैना (८) आणि अंबाती रायुडू (०) झटपट बाद झाले. त्यानंतर डुप्लेसी आणि सॅम करन यांनी चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. डुप्लेसीने नाबाद ३६ तर करनने नाबाद ४ धावा केल्या. 

पंजाबकडून मोहम्मद शमी दोन गडी बाद केले. तर अर्शदीप सिंग आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर मयंक अग्रवाल भोपळाही न फोडता चहरच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर लोकेश राहुल (५) धावबाद झाला. त्यानंतर चहरने ख्रिस गेल (१०), निकोलस पुरम (०) आणि दीपक हुडा (१०) यांना बाद केलं. त्यानंतर आलेल्या शाहरुख खानने एकाकी झुंज देत ३६ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४७ धावा केल्या. तर जिया रिचर्डसनने १५ धावा केल्या. त्यामुळे पंजाबला १०८ धावांपर्यंतच मजल मारता आली.

चेन्नईकडून चहरने चार विकेट घेतल्या. तर सॅम करन, मोईन अली आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.