मुंबई – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजयरथ रोखण्यात अखेर चेन्नई सुपर किंग्ज यशस्वी ठरले आहेत. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या 19व्या सामन्यात चेन्नईने बंगळुरूवर 69 धावांनी निर्णायक विजय मिळवला. चेन्नईने दिलेल्या धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात बंगळुरू 20 षटकांत 9 बाद 122 धावाच करू शकल्याने त्यांना यंदाच्या मोसमातील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह गुणतालिकेत चेन्नईने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली.
निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूची फलंदाजी ढासळली. कर्णधार विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर आणि मॅक्सवेल हे सपशेल अपयशी ठरले. विराट अवघ्या 8 धावा करून तंबूत परतला. सॅम करनच्या गोलंदाजीवर धोनीने यष्टीमागे त्याचा झेल घेतला. त्यानंतर पडिक्कलही मैदानावर तग धरू शकला नाही. पडिक्कलने 15 चेंडूत 34 धावांची खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरही चांगली कामगिरी करू शकला नाही. अवघ्या 7 धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाडने त्याचा झेल पकडला. त्यानंतर बंगळुरूच्या अपेक्षा असलेला मॅक्सवेलही स्वस्तात बाद झाला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर त्रिफाळाचीत झाला, तर रवींद्र जडेजाने क्षेत्ररक्षणातही कमाल दाखवत डॅन ख्रिश्चनला धावचीत केले. त्यानंतर लगेचच तिसऱ्या षटकात एबी डिव्हिलियर्सला त्रिफळाचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. जडेजाने 4 षटकांत 13 धावा देत 3 गडी बाद केले.
तत्पूर्वी, फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड या सलामीवीरांनी चेन्नईला दमदार सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारीही रचली. पण 10व्या षटकात युजवेंद्र चहलने ऋतुराजला बाद करत 74 धावांची भागीदारी तोडली. ऋतुराज 25 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर सुरेश रैना फलंदाजीला आला.
त्याने फाफ डू प्लेसिसला चांगली साथ दिली. दरम्यान, डू प्लेसिसने आयपीएलमधील सलग दुसरे अर्धशतक केले. मात्र, रैना 18 चेंडूत 24 धावा करून 14व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठच्या चेंडूवर डू प्लेसिसही 41 चेंडूत 50 धावांवर बाद झाला.
यानंतर अंबाती रायडू आणि रवींद्र जडेजाने चेन्नईचा धावफलक हलता ठेवला. रायडू मोठा फटका मारायच्या नादात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण अखेरच्या दोन षटकांत जडेजाचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. त्याने अखेरच्या षटकात एका नो बॉलसह 5 षटकार आणि 1 चौकार मारत एकूण 37 धावा वसूल करत अर्धशतकही पूर्ण केले. या फटकेबाजीने चेन्नई 20 षटकांत 4 बाद 191 धावांवर मजल मारू शकला. जडेजा 4 चौकार आणि 5 षटकारांसह 28 चेंडूत 62 धावांसह नाबाद राहिला.