चेन्नई – खलील अहमदच्या भेदक गोलंदाजी आणि जॉनी बॅअरस्ट्रोच्या फटकेबाजीच्या जोरावर सनरायजर्स हैद्राबाद संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्स संघावर ९ विकेट आणि ८ चेंडू राखून विजय मिळवला. हैद्राबादचा या हंगामातील हा पहिला विजय ठरला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाचा डाव १९.४ षटकांत सर्वबाद १२० धावांत संपुष्टात आला. प्रत्युत्तर हैद्राबाद संघाने १८.४ षटकांत १२१ धावा करून विजय साकार केला. यात जॉनी बेअरस्ट्रोने ५६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६३ धावा केल्या. तर डेव्हीड वॉर्नरने ३७ आणि केन विल्यम्सनने नाबाद १६ धावा केल्या.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबकडून मयंक अग्रवाल आणि शाहरुख खान यांनी प्रत्येकी २२ धावा केल्या. तर इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. खलील अहमदने तीन आणि अभिषेक शर्माने दोन विकेट घेतल्या. तर राशिद खान, भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.