जयपुर – शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता आणि वादाने रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 4 गडी राखून पराभव केला. अखेरच्या चेंडूवर 3 धावा हव्या असताना सॅंटनेरने षटकार ठोकून चेन्नईच्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र, सामन्या दरम्यान नो बॉलचा झालेला वाद कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या चांगलाच अंगलट आला आहे. झालेल्या वादात, धोनीने आचासहिंतेच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्याच्यावर 50% दंड आकारण्यात आला आहे. धोनीने ही चूक स्वीकारली देखील आहे. आयपीएलमधील कलम 2.20 अंतर्गत हा नियम लावण्यात आला आहे. ‘खेळाच्या भावनाविरूद्ध असलेले वर्तन’ हा नियम कलम 2.20 अंतर्गत लागू करण्यात येतो.
यावेळी अखेरच्या तीन चेंडूवर चेन्नईला केवळ 8 धावा हव्या होत्या. त्यावेळी मिशेल सॅंटनेर फलंदाजी करत होता. स्टोक्सने टाकलेला चौथा चेंडू कमरेच्या वरून जात होता म्हणून मुख्य पंच उल्हास गंधे यांनी नो बॉल ठरवला. परंतु, लेग अम्पायर ब्रूस ऑक्सनफर्ड यांनी तो नोबॉल नसल्याचे सांगितल्याने वाद झाला. त्यामुळे सामन्यादरम्यान वाद सुरू झाला. या वादात फलंदाज रविंद्र जडेजा आणि मिशेल सॅंटनेर हेदेखील सहभागी झाले. यावेळी महेंद्रसिंग धोनीनेही मैदानात येऊन वाद घातला. पण लेग अम्पायरचाच निर्णय अंतिम ठेवण्यात आला. यामुळे धोनी नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्याच्यावर दंड आकारण्यात आला आहे.