हैदराबाद – अंकित राजपूतच्या भेदक गोलंदाजीमुळे सुरुवातीलाच हादरे बसलेल्या सनरायजर्स हैदराबादने मनीष पांडेचे झुंजार अर्धशतक आणि त्याने शकिब अल हसन व युसूफ पठाणच्या साथीत केलेल्या भागीदाऱ्यांमुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 25व्या साखळी सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघासमोर 133 धावांचे आव्हान ठेवले. हैदराबादने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 132 धावा केल्या. अंकित राजपूतने केवळ 14 धावांत 5 बळी घेतले.
नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघाचे पहिले तीन फलंदाज अंकित राजपूतने पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या षटकांत परतविले. राजपूतने विल्यमसनला चौथ्याच चेंडूवर शून्यावर बाद केले. तिसऱ्या षटकांत त्याने शिखर धवनला (11) उसळत्या चेंडूवर बाद केले. तसेच पाचव्या षटकांत वृद्धिमान साहाला (6) धोकादायक फटका खेळण्यास भाग पाडले.
त्यानंतर मात्र मनीष पांडेने 51 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 54 धावांची खेळी करताना शकिब अल हसनसोबत चौथ्या विकेटसाठी 8.5 षटकांत 52 धावांची झुंजार भागीदारी करून हैदराबादचा डाव सावरला. शकिब 29 चेंडूंत 3 चौकारांसह 28 धावा करून परतल्यावर मनीष व युसूफ पठाण (नाबाद 21) यांनी पाचव्या विकेटसाठी 6 षटकांत 49 धावांची बहुमोल भर घालताना हैदराबादला 132 धावांची मजल मारून दिली.
त्याआधी दुखापतीतून परतलेला ख्रिस गेल या सामन्यात खेळणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे पंजाबच्या पाठीराख्यांनी निश्वास सोडला. तसेच युवराज सिंगच्या जागी पंजाबने आज मनोज तिवारीचा समावेश केला. भुवनेश्वर कुमार आज खेळणार नसल्याचे स्पष्ट होताच हैदराबादवरील दडपण वाढले. दरम्यान लोकेश राहुलला आयपीएलमधील एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी केवळ 39 धावांची गरज आहे.
संक्षिप्त धावफलक- सनरायजर्स हैदराबाद- 20 षटकांत 6 बाद 132 (मनीष पांडे 54, शकिब अल हसन 28, युसूफ पठाण नाबाद 21, अंकित राजपूत 14-5)
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा