IPL 2018 : दिल्लीचे कोलकातासमोर 220 धावांचे आव्हान

नवी दिल्ली – नवा कर्णधार श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी आणि कॉलिन मन्‍रो आणि पृथ्वी शॉ यांनी दिलेली वेगवान सलामी यामुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 26व्या साखळी सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर विजयासाठी 220 धावांचे आव्हान ठेवता आले.

नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 219 धावांची मजल मारली. कॉलिन मन्‍रोने केवळ 18 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 33 धावा फटकावताना पृथ्वी शॉच्या साथीत दिल्लीला केवळ 7 षटकांत 59 धावांची वेगवान पायाभरणी करून दिली. शिवम मावीच्या यॉर्करवर मन्‍रोचा त्रिफळा उडाल्याने ही जोडी फुटली. त्यानंतर पृथ्वी शॉने 44 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 62 धावा करताना कर्णधार श्रेयस अय्यरसह 7 षटकांत 68 धावांची भर घालत दिल्लीची आगेकूच कायम राखली.

पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत (0) लागोपाठ परतले. परंतु श्रेयस अय्यरने ग्लेन मॅक्‍सवेलच्या (27) साथीत केवळ 5.1 षटकांत 73 धावांची भागीदारी करीत दिल्लीला सुस्थितीत नेले. मॅक्‍सवेल अखेरच्या षटकांत धावबाद झाला. परंतु अय्यरने केवळ 40 चेंडूंत 3 चौकार व 10 षटकारांसह नाबाद 93 धावा फटकावताना दिल्लीला द्विशतकी टप्पा ओलांडून दिला.

त्याआधी दिल्लीचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरने आजच्या सामन्यासाठी संघात दोन बदल करताना गौतम गंभीर व डॅन ख्रिस्तियन यांना बाहेर ठेवून कॉलिन मन्‍रो आणि विजय शंकर यांना संघात स्थान दिले. त्याच वेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाने टॉम करनच्या जागी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनला पाचारण केले.

कोलकाता संघ सहापैकी तीन सामने जिंकून सहा गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. तर सहापैकी केवळ एक सामना जिंकता आल्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ तळाच्या स्थानावर घसरला आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना आज विजयाचीच गरज आहे.

 संक्षिप्त धावफलक- दिल्ली डेअरडेव्हिल्स- 20 षटकांत 4 बाद 219 (श्रेयस अय्यर नाबाद 93, पृथ्वी शॉ 62, कॉलिन मन्‍रो 33, ग्लेन मॅक्‍सवेल 27, रसेल 28-1, चावला 33-1 )


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)