IPL 2018 : चेन्नईविरुद्ध परतफेडीसाठी मुंबई इंडियन्स उत्सुक

परतीची साखळी लढत आज पुण्यात रंगणार

पुणे – स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी धडपडत असलेल्या मुंबई इंडियन्स संघासमोर आयपीएलच्या 11 व्या मोसमातील परतीच्या साखळी सामन्यात पुन्हा एकदा बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज संघाचे आव्हान आहे. या मोसमातील उद्‌घाटनाच्याच सामन्यात चेन्नईकडून पराभूत झालेला मुंबई इंडियन्स संघ त्याची परतफेड करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र चेन्नई संघाला नव्या “होम ग्राऊंड’वर प्रेक्षकांचाही जोरदार पाठिंबा मिळणार हे निश्‍चित.

गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाने या मोसमातील पहिला सामना जवळजवळ जिंकला होता. परंतु चेन्नईकडून अखेरच्या क्षणी ड्‌वेन ब्राव्होने केलेल्या अफलातून फटकेबाजीमुळे मुंबईच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. चेन्नईने तो सामना केवळ एक विकेट आणि एक चेंडू राखून जिंकला होता. परंतु मुंबईला या वेळी चेन्नईवर तितके वर्चस्व गाजविता येईल असे दिसत नाही. तसेच मुंबईसाठी हा सामना “जिंकू किंवा मरू’ असा असल्यामुले त्यांच्यावर प्रचंड दडपणही आहे.

मधल्या काळात या मोसमातील निम्मे साखळी सामने संपले असून चेन्नई संघ सहापैकी पाच सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याउलट मुंबईला सहापैकी केवळ एक विजय मिळविता आल्यामुळे त्यांची सातव्या क्रमांकावर घसरगुंडी झाली आहे. दिल्लीचेही तितकेच गुण असून खराब धावगतीमुळे त्यांची तळाच्या स्थानावर घसरण झाली आहे.

चेन्नई आणि मुंबई या संघांच्या एकंदर कामगिरीतील फरक हा त्यांच्या कर्णधारांच्या कामगिरीतील फरकाइतकाच स्पष्ट आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला बंगळुरूविरुद्धची 94 धावांची खेळी सोडल्यास गेल्या सहापैकी पाच सामन्यांत विशीही ओलांडता आलेली नाही. त्यामुळेच सूर्यकुमार यादवला चौथ्या स्थानावर पाठवून रोहितला सलामीच्या जोडीत खेळण्याचा निर्णय मुंबई संघ घेऊ शकेल. अर्थात रोहितबरोबरच कायरॉन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, एविन लुईस आणि हार्दिक पांड्या हे सर्व फलंदाज एकाच वेळी यशस्वी ठरले, तरच मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारता येईल.

मुंबईचे प्रस्थापित गोलंदाजही अपयशी ठरले आहेत. युवो फिरकी गोलंदाज मयंक मार्कंडेने 10 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली असली, तरी इतरांकडून साथ मिळत नसल्यामुले त्याच्या कामगिरीचे विजयात रूपांतर होत नाही. तसेच जसप्रीत बुमराह आणि मुस्तफिझुर रेहमान हे हुकमी वेगवान गोलंदाज “डेथ ओव्हर्स’मध्ये सपशेल अपयशी ठरल्यामुळे मुंबईची परिस्थिती अधिकच अवघड बनली आहे. आणखी एक गोलंदाज मिशेल मॅकक्‍लॅनेघन भलताच महागडा ठरला असल्याने उद्याच्या लढतीत त्याच्या जागी ऍडम मिल्नेचा समावेश होऊ शकतो.

चेन्नई सुपर किंग्जचे पारडे जड

मुंबईच्या अगदी उलट स्थिती चेन्नईची आहे. सुरेश रैना वगळता त्यांचे बहुतेक सर्व फलंदाज भरात आहेत. शेन वॉटसन, अंबाती रायुडू, ड्‌वेन ब्राव्हो आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना सूर गवसला असून उद्याच्या सामन्यातही त्याची पुनरावृत्ती होण्याचीच प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगची अपेक्षा आहे.

शार्दूल ठाकूर, इम्रान ताहिर, दीपक चाहर यांनी उपयुक्‍त कामगिरी बजावीत चेन्नईच्या विजयात वाटा उचलला आहे. हरभजन आणि ब्राव्हो यांच्याकडून अधिक अपेक्षा असल्या, तरी चेन्नईची सांघिक क्षमता पाहता दडपणाखाली असलेल्या मुंबईवर विजय मिळविणे त्यांना अवघड जाऊ नये. धोनीचे नेतृत्व हा चेन्नईसाठी बोनसच ठरतो. बंगळुरूविरुद्ध विजय मिळवून देताना धोनीने केलेली फटकेबाजी सर्वच प्रतिस्पर्ध्यांना धोक्‍याचा इशारा देणारी होती.

   प्रतिस्पर्धी संघ –

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कायरॉन पोलार्ड, मुस्तफिझुर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, ईशान किशन, राहुल चाहर, एविन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जीन पॉल ड्युमिनी, ताजिंदर सिंग, शरद लुंबा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयंक मार्कंडे, अकिला धनंजय, अनुकूल रॉय, मोहसीन खान, एम. डी. निधीश व मिचेल मॅकक्‍लॅनेघन.

चेन्नई सुपर किंग्स – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फाफ ड्यु प्लेसिस, हरभजन सिंग, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, केदार जाधव, अंबाती रायुडू, दीपक चाहर, के.एम.आसिफ, कनिश्‍क सेठ, लुंगी एन्गिडी, ध्रुव शौर्य, मुरली विजय, सॅम बिलिंग, मार्क वूड, क्षितिज शर्मा, मोनू कुमार, चैतन्य बिश्‍नोई, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, शार्दूल ठाकूर व एन. जगदीशन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)