IPL 2018 : चेन्नईविरुद्ध परतफेडीची बंगळुरूला संधी 

पुणे – मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवून पुण्यात दाखल झालेल्या कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोर आयपीएलमध्ये आज होणाऱ्या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज संघाचे आव्हान आहे. चेन्नईविरुद्ध गेल्या सामन्यातील पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धारानेच बंगळुरू संघ आज मैदानात उतरेल.
आयपीएलच्या अकराव्या मोसमात चांगले खेळाडू असूनही केवळ अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आल्याने पराभवाचा सामना करावा लागलेल्या रॉयल चॅलेंजर्सने गत सामन्यात सांघिक कामगीरीच्या जोरावर मुंबईचा 14 धावांनी पराभव करत पुनरागमन केले आहे. त्यांची फलंदाजी या हंगामात चांगली होत असून क्‍विन्टन डी कॉक, ऍब डीव्हिलियर्स, कर्णधार विराट कोहली खोऱ्याने धावा करत आहेत. मात्र त्यांचे गोलंदाज सातत्याने अपयशी ठरत आहेत.

त्यातच त्यांना प्ले-ऑफ मध्ये जागा मिळवायची असल्यास आता उरलेले सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.
गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या चेन्नईला मागील दोन लढतीत मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभूत व्हावे लागले. मात्र, दोन पराभवांनी खचणारा चेन्नईचा संघ नाही, हे बंगळुरूला चांगलेच माहीतआहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अग्रस्थानी असणारा अंबाती रायडू, सुरेश रैना, शेन वॉटसन आणि स्वत: कर्णधार महेंद्रसिंग धोनी जबरदस्त फॉर्मात आहेत. शिवाय गोलंदाजीत ड्‌वेन ब्राव्हो, के. एम. असिफ, इम्रान ताहिर असे भरात असलेले गोलंदाज चेन्नईकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे बंगळुरूला सामना जिंकायचा असल्यास सर्वच क्षेत्रांत अव्वल कामगिरी करावी लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रतिस्पर्धी संघ –
चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फाफ ड्यु प्लेसिस, हरभजन सिंग, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, केदार जाधव, अंबाती रायुडू, दीपक चाहर, के.एम.आसिफ, कनिष्क सेठ, लुंगी एन्गिडी, ध्रुव शौर्य, मुरली विजय, सॅम बिलिंग, मार्क वूड, क्षितिज शर्मा, मोनू कुमार, चैतन्य बिश्‍नोई, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, शार्दूल ठाकूर व एन. जगदीशन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), ऍब डीव्हिलिअर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्‍स, युझवेंद्र चाहल, उमेश यादव, ब्रेंडन मॅक्‍युलम, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, क्‍विन्टन डीकॉक, मोहम्मद सिराज, कॉलिन डी ग्रॅंडहोम, कोरी अँडरसन, एम.अश्‍विन, पार्थिव पटेल, मोईन अली, मनदीप सिंग, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साऊदी, कुलवंत खेजरोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे व अनिरुद्ध जोशी.
सामन्याची वेळ- दुपारी 4 पासून. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)