IPL 2018 : चेन्नईचे मुंबईसमोर 170 धावांचे आव्हान

पुणे – सूर गवसलेल्या सुरेश रैनाची शानदार खेळी आणि त्याने अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनीच्या साथीत केलेल्या भागीदाऱ्यांमुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील 27व्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी 170 धावांचे आव्हान ठेवता आले. रैनाने केवळ 47 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 75 धावा फटकावल्या.

मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी पाचारण केल्यावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 169 धावांची मजल मारली. चेन्नईने सावध प्रारंभ केल्यावर कृणाल पांड्याने वॉटसनला केवळ 12 धावांवर परतवून मुंबईला पहिले यश मिळवून दिले. मात्र भरात असलेल्या अंबाती रायुडूने सुरेश रैनाच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी 7 षटकांत 71 धावांची भागीदारी करीत चेन्नईला पायाभरणी करून दिली.

केवळ 35 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारांसह 46 धावा फटकावणाऱ्या रायुडूला बाद करीत कृणाल पांड्याने ही जोडी फोडली. त्यानंतर रैना आणि महेंद्रसिंग धोनी या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 5.5 षटकांत 46 धावांची भर घातली. धोनीने 21 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 26 धावांची खेळी केली. धोनी व ब्राव्हो यांना एकाच षटकांत बाद करून मॅकक्‍लॅनेघनने चेन्नईला हादरे दिले. बिलिंग्जही टिकला नाही. परंतु रैनाने चेन्नईला 169 धावांची मजल मारून दिली.

आयपीएलच्या 11 व्या मोसमातील उद्‌घाटनाच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला एक चेंडू व एक गडी राखून पराभूत केले होते. त्याआधी मुंबईने मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज कायरॉन पोलार्ड आणि वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रेहमान यांना आजच्या सामन्यासाठी विश्रांती दिली. त्यांच्या जागी मुंबईने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जीन पॉल ड्युमिनी आणि बेन कटिंग यांचा समावेश केला. चेन्नईने मात्र या आधीच्या सामन्यांतील संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

  संक्षिप्त धावफलक-

चेन्नई सुपर किंग्ज- 20 षटकांत 5 बाद 169 (सुरेश रैना नाबाद 75, अंबाती रायुडू 46, महेंद्रसिंग धोनी 26, मॅकक्‍लॅनेघन 26-2, कृणाल पांड्या 32-2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)