मुंबई – काल झालेल्या साखळी सामन्यात आपल्या भेदक गोलंदाजीने मुंबईच्या पराभवाला कारणीभूत ठरलेला हैदराबादचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याला ताकीद देण्यात आली आहे. त्याच्याकडून नेमकी काय चूक घडली आहे याचा खुलासा केला गेला नसला तरी हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने हा आरोप स्वीकारला असून सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहील असे जाहीर केले.
सिद्धार्थ कौलनेही आपली चूक मान्य केली असून सामनाधिकाऱ्यांचा निर्णय मान्य असेल असे जाहीर केले. सिद्धार्थने स्तर 1 अंतर्गत 2.1.4 च्या नियमाचा भंग केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. कौलने नेमका कोणता गुन्हा केला याबाबत खुलासा झाला नसला तरी त्याने मुंबईचा फलंदाज मयंक मार्कंडेला बाद केल्यानंतर त्याच्याकडे पाहून केलेल्या आक्षेपार्ह हावभावांमुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा