नवी दिल्ली : आयएनएक्स मिडिया प्रकरणात प्रकृतीच्या कारणास्तव अंतरिम जामीन मिळावा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायलयात केली.
चिदंबरम यांच्या वतीने ज्येष्ट वकील कपिल सिब्बल यांनी हा अर्ज दाखल केला. मुख्य न्यायाधिश डी. एन. पटेल आणि सी. हरी शंकर यांच्या खंडपीठापुढे बुधवारी ही याचिका सुनावणीसाठी येईल. हैदराबाद येतील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी (एआयजी) मधील त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सहा दिवसांचा अंतरीम जामीन मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांना 2017 पासून पोटदुखीचा त्रास होत आहे. पाच ऑक्टोबरपासून त्याची तीव्रता वाढून ते हा त्रास सहन करत आहेत.
एम्समध्ये त्यांची सात ऑक्टोबर रोजी तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी दिलेल्या औषधांममुळे त्यांना आराम पडला होता. त्यानंतर पुन्हा त्यांना त्रास झाल्याने एम्समध्ये 24 आणि 26 ऑक्टोबरला तर राम मनोहर लोहीया रुग्णालयात 28 ऑक्टोबरला तपासणी करण्यात आली होती. त्यांचे वजन साडेसात किलोने कमी झाले आहे, याकडे या याचिकेत लक्ष वेधले आहे. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर चार नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.