तस्करीमध्ये औषधनिर्मिती कंपन्यांचा समावेश?

लस उत्पादन, प्रयोगांसाठी साताऱ्यातून सापांसह अन्य प्राण्यांची पुणे शहरात छुपी विक्री

– गायत्री वाजपेयी

पुणे – शहर परिसर तसेच सातारा जिल्ह्यांमधील तस्करी होणाऱ्या प्राणी आणि वनस्पतींना सर्वाधिक मागणी ही औषधनिर्मिती कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचा धक्कादायक खुलासा पर्यावरण अभ्यासकांनी केला आहे. विशेष म्हणजे अतिशय गुप्तपणे सुरू असलेल्या तस्करी आणि अवैध विक्रीमध्ये स्थानिक नागरिकांबरोबरच वनविभागाचेच काही अधिकारी, स्वयंसेवक सहभागी असल्याचा दावा अभ्यासकांकडून केला जात आहे.

विविध प्रकारच्या लसनिर्मितीसाठी प्राण्यांची आवश्‍यकता असते. यासाठी सरकारने ठरवून दिलेल्या अधिकृत प्रक्रियेमार्फतच हे प्रयोग करता येतात. मात्र, अनेकदा औषधनिर्मिती कंपन्यांकडून हे नियम धाब्यावर बसवून, अवैध मार्गाने प्राण्यांचा वापर केला जातो.

कुठलाही थांगपत्ता लागू न देता प्राणी आणि वनस्पतींच्या विक्रीचा अवैध कारभार सर्रासपणे सुरू असतो. प्रामुख्याने साप, विविध औषधी वनस्पती यांचा सर्वाधिक समावेश या तस्करीत आहे. याबाबत सातारा येथील पर्यावरण अभ्यासक रोहन भाटे म्हणाले की, सातारा जिल्हा हा जैवविविधतेने अतिशय संपन्न परिसर आहे.

तर पुण्यामध्ये औषधनिर्मिती कंपन्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील वाहतूकही तुलनेने अधिक सोयीस्कर आणि कमी वेळेची आहे. सातारा जिल्हा परिसरात सापांचे प्रमाण अधिक आहे. या सापांच्या विषाचा वापर औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये विविध लसींच्या निर्मितीसाठी केला जातो. त्यासाठी अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी स्थनिक नागरिकांकडून साप विकत घेतात. कमी पैशामध्ये अधिक साप मिळत असल्याने कंपनी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांचा फायदा होतो.

याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे माजी आयुक्त आर. बी. जोशी म्हणाले की, औषधनिर्मिती कंपन्यांकडून लस विकसित करण्यासाठी सापाच्या विषाचा वापर केला जातो. तसेच, विविध प्रयोगासाठीही या प्राण्यांचा वापर केला जातो. मात्र त्यासाठी कमिटी “फॉर द पर्पज ऑफ कंट्रोल ऍण्ड सुपरव्हिजन ऑन एक्‍सपिरिमेंट ऑन ऍनिमल’ या समितीकडे नोंदणी करून मान्यता घ्यावी लागते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.