मुंबई – अमेरिकीेची कार उत्पादक कंपनी टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांना महाराष्ट्राबरोबरच, तेलंगणा, पंजाब आणि प बंगाल या राज्यानी आपल्या राज्यात येऊन उत्पादन घेण्याचे निमंत्रण दिले आहे.
गेल्याच आठवड्यात भारत सरकारच्या नियमांच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वेळ जात असल्यामुळे टेस्लाला भारतात येण्यासा उशीर होत असल्याचे मस्क यांनी सांगितले होते. भारतात सरकारी आव्हानांचा सामना करावा लागत असल्याची नाराजी मस्क यांनी व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मस्क यांना आमंत्रण दिले आहे. टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची हमी पाटील यांनी मस्क यांच्या ट्विटला रिप्लाय करुन दिली.
भाजपाची सत्ता असणारी राज्ये टेस्लासारखी कंपनी महाराष्ट्राचीच निवड करेल, असे वाटत असताना कार्यालयासाठी मस्क यांनी बंगळुरूची निवड केल्याने टेस्लाचा प्रकल्प भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातच जाणार असे वातावरण तयार झाले होते. पण मस्क यांच्या ट्विटमुळे इतर राज्यांना गुंतवणूक आकर्षित करण्याची संधी मिळाली.
तेलंगणचे मंत्री के टी रामाराव यांनी सर्वात आदी मस्क यांना गुंतवणुकीसाठी निमंत्रण दिले होते. तेलंगणमध्ये उद्योग उभारण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची हमी त्यांनी ट्विटद्वारे दिली होती. त्याचप्रमाणे पंजाबमधील कॉंग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनीही मस्क यांना ट्विट करुन पंजाबमध्ये टेस्लाचा कारखाना उभारण्याचे आवाहन केले होते.
याशिवाय तामिळनाडूचे मंत्री टी. आर. बी. राजा, पश्चिम बंगलाचे मंत्री गुलाम रब्बानी यांनीही ट्विटरवरुन मस्क यांना आपआपल्या राज्यात येण्यासाठी थेट ट्विटरवरुन ऑफर दिल्या.
मस्क यांची कंपनी ही सध्या जगातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक कार निर्मिती करणारी कंपनी आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे मस्क हे आता यावर काय निर्णय घेतात किंवा भारतातील कोणत्या राज्याला ते प्राधान्य देतात हे येणाऱ्या कालावधीमध्येच स्पष्ट होईल.