इस्रायलमध्ये नेतान्याहू यांना सरकार स्थापण्याचे निमंत्रण

जेरुसलेम – इस्रायलचे अध्यक्ष रिव्हलिन यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना आज सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले. इस्रायलमध्ये अलिकडेच झालेल्या निवडणूकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्या पार्श्‍वभुमीवरच अध्यक्षांनी नेतान्याहू यांना सरकार स्थापण्यासाठी निमंत्रित केले आहे.

इस्रायलची संसद अर्थात नेसेटला आत्मविश्वास वाटावा असे सरकार स्थापन करण्याची कोणत्याही उमेदवाराला वास्तववादी संधी नाही, असे अध्यक्षांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. इस्रायलमध्ये गेल्या दोन वर्षात चार वेळा निवडणूका झाल्या आहेत. मात्र दीर्घकालीन सरकार देऊ शकेल, असे बहुमत कोणत्याच पक्षाला मिळू शकलेले नाही.

इस्रायलच्या नेसेटमध्ये नेतान्याहू यांना सर्वाधिक 52 जागा मिळाल्या आहेत पण 61 जागांच्या बहुमताच्या तुलनेत ते अद्याप कमी आहे. मात्र इतर पक्षांच्या तुलनेत नेतान्याहू यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्याने सरकार स्थापन करण्यासाठी त्यांचा दावा योग्य असल्याचे मानले जात आहे. विरोधी पक्षनेते यायर लॅपीड यांनी 45 जागा मिळवल्या. त्यांना 16 जागा कमी पडल्या आणि उजवे राष्ट्रवादी नफ्ताली बेनेट यांनी त्यांच्या यमीना पक्षाकडून सात मते मिळविली.

पंतप्रधानपदाचे नामनिर्देशन मिळाल्याने नेतान्याहू यांना कारकीर्द वाचवण्याचा प्रयत्न करण्याची नवीन संधी मिळाली आहे. त्यांनी सलग 12 वर्षे इस्रायलच्या पंतप्रधानपदावर राहण्याची कामगिरी करून दाखवली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.