खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीस अडथळा : रोज लाखो रुपयांची टोल वसुली तरी दुरुस्तीकडे दुर्लक्ष

कामशेत – टोलच्या रुपात रोज लाखो रुपयांची वसुली करुन देणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गाची अवस्था बिकट होत चालली आहे. कामशेत गावच्या हद्दीमध्ये रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडल्याने अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. महामार्गाच्या मध्यभागीच हे खड्डे पडल्यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत असून अपघातास निमंत्रण देणारे हे खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कामशेत गावच्या हद्दीमधून जाणाऱ्या जुन्या मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. आता, पावसाळा संपून एक महिना उलटला तरीही अद्याप महार्मावरील खड्डे बुजवलेले नाहीत. रस्त्याच्या ऐन मध्यभागी मोठे खड्डे पडल्यामुळे दररोज लहान मोठे अपघात होवून अनेक जण जखमी होत आहे. या रस्त्यावरुन दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते.

मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अवजड वाहने व इतर वाहनाचे वेग मंदावल्याही असून अनेक वेळा वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी वारंवार होत असूनही रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे संतप्त नागरिकांनी खड्डे लवकर न बुजविल्यास टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.04 वर दररोज लाखों रुपयांची टोल वसुली होत असून देखील महामार्ग दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहेत . त्यामुळे लवकरात लवकर महामार्गावरील खडडे न बुजविल्यास आम्ही टोल बंद आंदोलन करणार आहोत.
– रमेश भुरूक, सामाजिक कार्यकर्ते


मागील काही दिवसापासून महामार्गावर खड्डे पडलेले आहेत. लवकरच या खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करणार असून हे खड्डे लवकरात लवकर भरून घेणार आहोत.
– दिलीप उकिर्डे, मुख्य कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी

Leave A Reply

Your email address will not be published.