वाघोली (प्रतिनिधी) – वाघोलीतील खेळाडूंना प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यासाठी उपसरपंच करंडक क्रिकेट स्पर्धेला भेट देण्याची विनंती महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांचेकडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र भाडळे,माजी उपसरपंच संदेश आव्हाळे यांनी केली आहे.
याबाबतीत महेंद्र भाडळे यांनी सांगितले की जिल्हा तसेच राज्यस्तरावर वाघोली परिसरातून उत्तम खेळाडू निर्माण व्हावेत या संकल्पनेतून दानशूर मंडळी व क्रीडा प्रेमींच्या मागणीनुसार उपसरपंच करंडक क्रिकेट स्पर्धा महेंद्र भाडळे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेला भेट देऊन क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची विनंती माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचेकडे केली आहे.
वाघोली मध्ये गेल्या दोन-तीन महिन्यापासून होत असणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धांमुळे सोशल मीडियावर रोमहर्षक तसेच नेत्र दीपक खेळाच्या व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन मिळून खेळाडूंनी आपल्या भागाचे नाव उज्वल करावे यासाठी या क्रीडा स्पर्धा मोलाची कामगिरी करत असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले.