परभणीच्या शेतकऱ्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण
मुंबई: साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही…तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव गरूड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं…तर पहिल्यांदा कर्जमुक्तीसाठी हेलपाटे मारावे लागले नाही अशी भावना अहमदनगर जिल्ह्यातल्या पोपट मुकटे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांजवळ व्यक्त केली. या दोन्ही प्रातिनिधीक प्रतिक्रिया शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या यशस्वी अमंलबजावणीचे यश अधोरेखित करणाऱ्या ठरल्या.
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. ठाकरे व उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते आज झाला. त्यानिमित्त परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली.
हेलपाटे मारावे लागले का ?
या योजनेचा लाभ घेताना काही त्रास झाला का…किती हेलपाटे मारावे लागले, किती कर्ज होते, कुठल्या पिकासाठी कर्ज घेतले होते. आधीच्या आणि आताच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये काय फरक जाणवला असे प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांना विचारले. त्यावर योजनेबाबत शंभर टक्के समाधानी असल्याची भावना अहमदनगर जिल्ह्यातील पोपट मुकटे यांनी व्यक्त करताना ‘मागील वेळेस पाच ते सहा वेळा चकरा माराव्या लागल्या आता केवळ एका थम्बवरच काम झाले’असे त्यांनी सांगितले.
लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छा
परभणीच्या पिंगळी येथील विठ्ठलराव गरूड यांनी कर्जमुक्तीची रक्कम मिळणार असल्यानं चिंता मिटल्याची भावना व्यक्त केली आणि मुलीचं लग्न जमलंय अशी आनंदाची बातमी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलीला कुठं दिलं अशी आपुलकीची विचारपूस करतानाच लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. हा संवाद ऐकताना हरखून गेलेल्या विठ्ठलराव यांनी लगोलग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मुलीच्या लग्नाचे निमंत्रणही दिले.