शेअर बाजार निर्देशांक कोसळल्याने गुंतवणूकदारांचे 5.3 लाख कोटींचे नुकसान

मुंबई – शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक 3.8 टक्‍क्‍यांपर्यंत कोसळल्यामुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे तब्बल 5.37 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

निर्देशांक कोसळल्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या सर्व कंपन्यांचे बाजार मूल्य 5.37 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 200.81 लाख कोटी रुपये इतके झाले. या महिन्यात शेअर बाजारांच्या निर्देशांकामध्ये प्रचंड चढ-उतार झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी 52,000 अंकांपर्यंत झेपावलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आता 49,000 अंकावर आला आहे. आज झालेली एकाच दिवसातील विक्री चार मे नंतर प्रथमच झाली आहे.

या बाबत बोलताना मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस चे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमा यांनी सांगितले की, देशात आणि परदेशात बाजार बंद होण्यापूर्वी अनेक नकारात्मक घटना घडल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकांत इतकी मोठी घट झाली.

शेअर बाजार बंद झाल्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली. याला सोमवारी गुंतवणूकदार कसा प्रतिसाद देतात याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. आगामी काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढण्याची शक्‍यता राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीतून दिसून येते.

त्यामुळे ज्या चांगल्या कंपन्यांचे शेअर आता कमी झाले आहेत त्यांची काही प्रमाणात खरेदी करण्याचा सल्ला विश्‍लेषक देत आहेत. आज झालेल्या विक्रीचा फटका बॅंकिंग क्षेत्राला सर्वाधिक बसला. त्याबरोबरच दूरसंचार कंपन्यांच्या शेअरच्या भावात ही मोठी घट झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.