पिंपरी – एका फर्मद्वारे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून पाच जणांची 23 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कासारवाडी येथे उघडकीस आला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 मार्च 2021 ते 4 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला.
संतोष जयसिंग पवार (वय 45, रा. लोहगाव, पुणे) आणि एक महिला (वय 35) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अफरोज मेहबूब शेख (वय 36, रा. केशवनगर, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी त्यांच्या गुरुदेव मल्टी सर्व्हिसेस फर्म याद्वारे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मासिक दहा टक्के आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादी शेख यांचा विश्वास संपादन करून त्यांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले.
शेख यांनी देखील 16 लाख 60 हजार रुपये गुंतवले. त्यातील चार लाख रुपये मूळ मुद्दल शेख यांना परत मिळाली. उर्वरित 12 लाख 60 हजार रुपये आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरून शेख यांची फसवणूक केली. शेख यांच्या व्यतिरिक्त आणखी चार जणांची देखील फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पाच जणांची मिळून 23 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.