मुंबई – महागाई जास्त आहे. व्याजदर जास्त आहेत. विकासदर कमी झाला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून देशातील गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी चालूच ठेवल्यामुळे सोमवारी शेअर बाजार निर्देशांकात अर्धा टक्के वाढ झाली.
परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्री चालूच असून शुक्रवारी या गुंतवणूकदारानी 4,383 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मंद विकासदराच्या आकडेवारीनंतर सोमवारी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली. मात्र तरीही दीर्घ पल्ल्यात ब्लु चीप कंपन्यात केलेली गुंतवणूक नफादायक ठरेल असे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे खरेदी चालू आहे.
अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, टेक महिंद्रा, टायटन, मारुती, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मिड कॅप व स्मॉल कॅप एक टक्क्यापर्यंत वाढले. बांधकाम क्षेत्र, ग्राहक वस्तू, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राच्य निर्देशांकात वाढ झाली. तर बँकिंग क्षेत्र पिछाडीवर होते.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस या कंपनीचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले की, कमी झालेला विकासदर आणि अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क वाढविण्याची दिलेली धमकी पाहता आगामी काळात गुंतवणूकदार सावध राहून गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्देशांक अस्थिर राहू शकतील.