मुंबई – अमेरिकेच्या हितसंबंधांना सर्वोच्च प्राधान्य देणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आहेत. अशा परिस्थितीत ते देशातील आणि विदेशातील विविध मुद्यावर प्रक्षोभक वक्तव्य करण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प भारताबाबत काय वक्तव्य करतात आणि त्याला भारत कसा प्रतिसाद देईल याकडे गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष असल्याचे सांगण्यात आले.
भारत अमेरिकेच्या वस्तूवर आवश्यकतेपेक्षा जास्त आयात शुल्क लावत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी वेळोवेळी केलेला आहे. त्यांनी भारताला टेरिफ किंग असे संबोधले होते. सध्या तरी भारताच्या व्यापार विषयक धोरणावर ट्रम्प यांनी वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प कधी आणि काय बोलतात हा चर्चेचा विषय आहे.
या अगोदर अमेरिकेने भारताच्या पोलाद आणि ल्युमिनियमवर कथित बेकायदेशीर आयात शुल्क लावले होते. भारताने या विरोधात आपली भूमिका स्पष्ट करून अमेरिकेच्या भारतात येणार्या सफरचंदावर आयात शुल्क लावले होते. त्याचबरोबर इतर 29 अमेरिकन उत्पादनावरही भारताने आयात शूल्क लावले होते.
गेल्या वर्षी प्रचार मोहिमेवेळी ट्रम्प यांनी जर भारताने अमेरिकन वस्तूवर जास्त आयात शुल्क लावले तर अमेरिकाही भारताच्या वस्तवर आयात शुल्क लावील असे सांगितले होते. अमेरिकेने जर आक्रमक भूमिका घेत भारतीय आयातीवर शुल्क लावले तर भारतानेही या अगोदर केल्याप्रमाणे अमेरिकेच्या वस्तूवर आयात शुल्क लावण्याची गरज असल्याचे मत ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह या संस्थेचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी सांगितले.
भारताने आपल्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी संतुलित प्रतिसाद देणे गरजेचे आहे. जर अमेरिकेने नकारात्मक भूमिका घेतली तर भारतातून अमेरिकेत होणार्या वाहन, कापड, औषध निर्यातीवर अधिक आयात शुल्क लावले जाऊ शकते. जर डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन -बी व्हिसासंदर्भातील नियम कडक केले तर त्याचा भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. मात्र जर अमेरिकेला भारतातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे मनुष्यबळ मिळाले नाही तर अमेरिकेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या विषयावर अमेरिक नकारात्मक धोरण जाहीर करणार नाही.