नवी दिल्ली – देशातील नागरीकांचा म्युचुअल फंडातील गुंतवणुकीचा ओढा वाढत असून जून २०२४ ला संपलेल्या तीन महिन्यांत म्युचुअल फंडातील मालमत्ता १.४१ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या तीन महिन्यात झालेली ही वाढ तब्बल ३१ टक्के इतकी आहे.
विशेष म्हणजे, इन्व्हेस्को इंडिया फोकस्ड फंड, महिंद्रा मॅन्युलाइफ फोकस्ड फंड, जेएम फोकस्ड फंड आणि एचडीएफसी फोकस्ड ३० फंड यांसारख्या म्युच्युअल फंड हाऊसेसने ऑफर केलेल्या काही फोकस्ड फंडांनी गेल्या वर्षी ४० ते ६० टक्क्यांचा उल्लेखनीय परतावा दिला, त्यामुळे शेअर बाजारातील या मार्गाने गुंतवणुक वाढीला लागली आहे.
सर्वसाधारणपणे म्युचुअल फंडातील गुंतवणुकीतून १५ ते २० टक्के इतका वार्षिक लाभ मिळतो. बँकांमधील व्याजदरापेक्षा हा परतावा अधिक आकर्षक मानला जातो.
एकंदरीत, इक्विटी म्युच्युअल फंडांची मालमत्ता जून २०२४ मध्ये एकूण २७.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली जी जून २०२३ मध्ये १७.४३ लाख कोटी होती.