गुंतवणूक मंत्र: दर्जेदार कंपन्यांच्या बाबतीत गुंतवणूकदारांचा जोखमीचा खेळ

बाजार ठोस दिशेच्या शोधात

मागील आठवड्यात, बाजाराच्या प्रमुख दोन निर्देशांकांनी निरनिराळी हालचाल. निफ्टी 50 या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक साधारण 13 अंशांनी घसरला तर मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्‍स केवळ 33 अंशांनी वधारला. ही गोष्ट बाजारात ठोस दिशा सापडली नसल्याचंच दर्शवते. मागील सोळा महिन्यातील उच्चांक गाठलेला महागाईचा दर आणि दहा औद्योगिक क्षेत्रांसाठी विशेष आर्थिक योजना राबवण्याची केंद्र सरकारची हमी अशा दोन टोकाच्या बातम्यांमुळं बाजार अस्थिर झाला.

13 नोव्हेंबर रोजी दैनिक आलेखावर निफ्टीनं लघु मुदतीचा चढता कल तोडून त्याखाली बंद दिला आहे परंतु पुढील दोन दिवसांत निफ्टीनं पुन्हा विरुद्ध दिशेनं म्हणजे उर्ध्व दिशेनं कूच केलेली आहे. त्यामुळं या आठवड्यात बाजारात वरील दिशा प्राप्त होण्यासाठी निफ्टीनं 12050 ही पातळी छेदून त्यावर बंद होणं अपेक्षित आहे. त्याउलट तोडलेला तेजीचा कल मंदीवाल्यांना 11700 या पातळीची आठवण करून देत आहे. त्यामुळं ट्रेडर्सनी सध्या तरी काठावर राहून वरीलपैकी कोणतीही एक पातळी तोडल्यास त्यास अनुसरुन आपल्या पोझिशन्स घ्याव्यात हे हिताचं. त्यामुळे 12050 व 11700 यांदरम्यान बाजार दोलायमान राहू शकतो असं म्हटल्यास धाडसाचं ठरायला नको.

गेली कांही वर्षं आपण पाहतो की, रिअल इस्टेट क्षेत्रात प्रचंड मंदी चालू आहे. मंदी म्हणजे काय तर नवीन मालाला उठाव नाही म्हणजे फ्लॅट्‌स सहजासहजी विकले जात नाहीत, किंवा घेणारी व्यक्ती भाव पाडून मागते, तयार म्हणजे रेडी पझेशन फ्लॅट्‌स विकले जात नाहीत याउलट तेजीमध्ये हेच फ्लॅट्‌स बुकिंगमध्येच विकले जात असत. त्यामुळं नवीन फ्लॅट्‌स, पर्यायानं नवीन हाऊसिंग प्रोजेक्‍ट्‌स, नवीन बांधकाम तितक्‍या धडाडीने / जोराने होताना दिसत नाहीय.

आता अर्थातच वेगवेगळ्या शहरांत, शहरातील निरनिराळ्या भागात परिस्थिती वेगळी असू शकते. परंतु एकूणच मंदी आहे ! आता मंदी असल्या कारणानं त्याचा परिणाम त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टींवर पडणारच. त्यामुळं सिमेंट, टाईल्स, रंग, वायर्स, इलेक्‍ट्रिकल्स इ. क्षेत्रांत देखील मंदी भेडसावू शकते. तसं पाहता मंदीमध्ये फायदा कोणाला होऊ शकतो ? तर ज्याला खरंच घराची गरज आहे किंवा घर घ्यावयाचं आहे व ज्याकडं त्यासाठी पैसादेखील आहे अशांसाठी अशी मंदी सुवर्ण संधी ठरू शकते.

संपूर्ण बांधून झालेली इमारत (अर्थातच कंप्लिशन सर्टिफिकेट) म्हणजेच तयार व उपलब्ध फ्लॅट. सर्वसामान्य परिस्थितीत ग्राहकास हाच फ्लॅट कदाचित बुक केलेल्या भावातच घ्यायला लागला असता परंतु मंदी असल्यानं ग्राहकास भावात घासाघीस करून, भावात तोडून रास्त दरात फ्लॅट खरेदी करण्याच्या यासंधीचं रूपांतर फायद्यात करता येऊ शकतं. परंतु प्रश्न पडतो की ही गोष्ट सगळीकडंच लागू होऊ शकते का ? हीच गोष्ट इतर क्षेत्रात कशी लागू होती ते पाहूया..

भाजीपाला – पुरवठा जास्त व मागणी कमी असल्यास उत्तम माल सुद्धा नेहमीपेक्षा स्वस्त मिळू शकतो. उदा. कोथिंबीर, कधी 5 रुपयांत दोन जुड्या तर कांही वेळेस 25 रुपये / जुडी. तसंच दुसरं उदाहरण टोमॅटो.. ‘भाव न मिळाल्यानं ट्रकच्या ट्रक टोमॅटो रस्त्यावर फेकले’ अशी बातमी आपण अनेक वेळा वाचली असेल, म्हणजेच अशा कवडीमोल भावातील टोमॅटो खरेदी ही टोमॅटो प्रक्रिया उद्योगास फायद्याची. या विशिष्ट क्षेत्रात भाव घसरण्याचं मुख्य कारण म्हणजे मालाचा नाशवंत प्रकार. परंतु अशीही कांही उदाहरण आहेत की जेथे आपण भाव कमी करू शकत नाही जरी त्या गोष्टी नाशवंत असतात किंवा ठराविक कालावधीसाठीच असतात.

उदा. हॉटेल, मनोरंजन. हॉटेलमध्ये अजिबात गिऱ्हाईक नसताना आपण एखाद्या डिशचा भाव कमी करण्यास धजावत नाही. तसंच एखाद्या सुमार चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण चित्रपटगृह ओस पडलं असेल तरी आपण तिकिटाचा दर कमी होईल अशी अपेक्षा सुद्धा ठेऊ शकत नाही. याउलट जरी कांही गोष्टी या टिकाऊ असल्या तरी आपणांस त्यात घासाघीस करता येऊ शकते. उदा. कपडे खरेदी – सर्वांच्या समोरचं उदाहरण म्हणजे विविध ऑफर्स व डिस्काउंट सेल; गृहोपयोगी वस्तू खरेदी – पुन्हा सेल किंवा ऑफर्स.

आता या उल्लेखलेल्या क्षेत्रात कमी भावात वस्तू / सेवा घेण्यासाठी तेच लोक ग्राहक होऊ शकतात ज्यांना त्या विशिष्ट वस्तूची अथवा गोष्टीची गरज आहे अथवात्यावस्तूचं अथवा गोष्टीचं योग्य उपभोग्य (सुखसमाधान) मूल्य माहीत आहे किंवा त्याच्या रास्त भावाचा अंदाज आहे. उदा.हिऱ्याचं खरं मूल्य (किंमत नाही) बहुतेकांना माहीत नाही परंतु डिस्काउंट सेलमध्ये ज्वेलर्स अथवा कोणत्या तरी कंपनीच्या भरवशावर आपण त्याची किंमत देऊन खरेदी करत असतो, याचं कारण त्या खड्याचं उपभोग्य मूल्य. म्हणजे कांही हजारांचा सॉलीटेअर नेकलेसमध्ये मिरवताना तो लाखांचा भासवला जाऊ शकतो.

या गोष्टी वापरत असताना मिळणारं सुखसमाधान आणि त्यासमोर अदा केलेली किंमत यामध्ये सकारात्मक तफावत असल्यास त्याला संधी म्हणता येऊ शकतं आणि अशी वस्तू / गोष्ट चटकन घेतली जाते. परंतु अगदी याउलट घडतं गुंतवणूकीबाबत किंवा शेअर बाजारात. (घर / जागा वगळता, घराचा उल्लेख वर केलेलाच आहे). याचं कारण म्हणजे त्यात उपभोग्य मूल्य शून्य असतं, याउलट केली जाणारी गुंतवणूक सुरक्षित ठेवणं आणि त्याच्या भावात वाढ (मूल्यात नाही) ह्याच दोन गोष्टी येथे अपेक्षित असतात.. त्यामुळं जर शेअर बाजार पडला, अगदी उत्तमोत्तम कंपन्यांचे शेअर्स 30-40 टक्के पडले तरी आपण त्यांस हात लावायला धजावत नाही.

उदा. अनिल अंबानीच्या धास्तीमुळं रिलायन्स निप्पॉन ऍसेट मॅनेजमेंट कंपनीचा शेअर 300 रुपयांवरून फेब्रुवारीमध्ये 130 रुपये आला असताना देखील भीतीपोटी सर्वसामान्य गुंतवणूकदार त्यापासून दूर राहिले, कारण कोणत्याही कंपनीचं म्हणजे शेअरचं खरं, अचूक मूल्यमापन करणारं कोणतेही साधन उपलब्ध नाहीय. नाहीतर गेल्यावर्षी 400 रु.च्या जवळपास गेलेला येसबॅंकेचा शेअर पडून गेल्या महिन्यात 30 रुपयांपर्यंत आलाच नसता. त्यामुळं जरी भाव खाली आल्यानंतर गुंतवणूकदार साशंक होतात असा अनुभव आहे.

तरी संपत्ती जोडण्यासाठी निश्‍चित उत्पन्न पर्याय (फिक्‍स्ड इन्कम) कायमस्वरूपी फायद्याचे ठरतनाहीत, त्यामुळं जरी हा खेळ जोखमीचा असला तरी गुंतवणूकदार आता त्यांच्या वित्तीय मालमत्तेचा मोठा हिस्सा महागड्या वाटल्या तरीसुद्धा दर्जेदार कंपन्यांमध्ये गुंतवण्याबाबत सकारात्मक होताना आढळत आहेत. त्याजबरोबरीनं पूर्वी स्मॉलकॅप व मिडकॅपमध्ये हात पोळून घेतलेले गुंतवणूकदारही अशाच नावाजलेल्या लार्ज कॅप कंपन्या रास्त भावात मिळण्यासाठी आशावादी आहेत.

सध्याच्या काळात गुंतवणूकदार वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रांतील दर्जेदार कंपन्यांचा पोर्टफोलिओ बनविण्यावर भर देऊ शकतात जो कमी जोखीम घेऊन एकत्रितरित्या ठीकठाक परतावा देऊ शकेल.तरीदेखील बाजाराचा स्वभाव लक्षात घेता, कोणत्याही शेअर खरेदीसाठी जोखीम घेताना ती मोजूनच घ्यावी हे नक्की.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)