गुंतवणुकीचे धडे क्रिकेटच्या भाषेत! (भाग-३)

गुंतवणुकीचे धडे क्रिकेटच्या भाषेत! (भाग-१)

गुंतवणुकीचे धडे क्रिकेटच्या भाषेत! (भाग-२)

संघ निवड – खेळण्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी संघ व्यवस्थापन व कर्णधार आपल्या संघात योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतात. खेळपट्टीनुसार योग्य असे गोलंदाज व फलंदाजांची निवड केली जाते. गुंतवणूक करतानाही आपल्या नियोजनानुसार योग्य गुंतवणूक पर्यायांची निवड करणे आवश्यक असते. हे करत असताना कर्णधार ज्याप्रमाणे संघ व्यवस्थापनाची मदत घेतो त्याचप्रमाणे प्रत्येक गुंतवणूकदाराने योग्य सल्ला व मार्गदर्शनासाठी निश्चितच आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घेणे आवश्यक आहे. संघामध्ये जसे योग्य फलंदाज, योग्य गोलंदाज व अष्टपैलू खेळाडुंची समतोल साधून निवड करणे आवश्यक असते त्याप्रमाणे गुंतवणूक करत असताना सुद्धा आर्थिक गुंतवणूक पर्यायांमध्ये म्युच्युअल फंडांच्या योजनांच्या एकूण उपलब्धतेप्रमाणे इक्विटी योजना, डेट योजना, सोन्यामध्ये गुंतवूणूक करणारी योजना, जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या योजना, अशा अनेक पर्यांयांमधून योग्य संतुलित गुंतवणूक करणे आवश्यक असते. आपल्या उद्दीष्टांप्रमाणे कमी किंवा जास्त गुंतवणूक योग्य पर्यायांमध्ये करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीच्या एकूण पोर्टफोलिओमध्ये आवश्यकतेनुसार योग्य गुंतवणूक पर्यायांचीच निवड करणे व त्यामध्ये समतोल ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

उद्दीष्टांचे नियोजन – क्रिकेटमध्ये खेळ सुरु होण्याआधीच फक्त जिंकण्याचेच उद्दीष्ट घेऊन नियोजन केले जाते. त्याचप्रमाणे गुंतवणूक करतानाही केवळ आपल्या भविष्यातील उद्दीष्टपूर्ततेचाच विचार करून गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यासाठी नीटनेटका व वेळेत पूर्ण होणारा, उद्दीष्ट पूर्ततेची रक्कम निश्चित उभी करणारा नियोजित आराखडा आवश्यक आहे.

हे करत असताना मुख्यतः उद्दीष्टांची यादी, त्यासाठी लागणारा वेळ, लागणारा पैसा व आपल्याकडे येणाऱ्या पैशातून बचत जास्तीत जास्त करून योग्य अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे क्रिकेटच्या सामन्यामध्ये खेळताना परिस्थितीनुसार योग्य फलंदाजाला खेळायला पाठवणे तसेच संघाच्या धावसंख्येत गरजेनुसार फटकेबाजी करून वेग देणे व किमान धावसंख्येचे उद्दीष्ट घेऊनच फलंदाजी करणे हे ठरवले जाते त्याचप्रमाणे गुंतवणुकीमध्येही गुंतवणुकीच्या कालावधीमध्ये योग्य पर्यायांची निवड करणे, आवश्यकतेप्रमाणे गुंतवणूक वाढवणे व ठरवलेल्या उद्दीष्टांप्रमाणे निश्चित रक्कम गोळा होईल याचे परिपूर्ण नियोजन गुंतवणूकदारास करणे आवश्यक आहे.

संघ मार्गदर्शक (कोच) प्रत्येक विजेत्या संघामागे संघातील खेळाडूंचे योगदान असतेच त्यामध्ये कर्णधाराची भूमिका महत्त्वाची ठरते परंतु या सर्वांच्या यशामागे पडद्यामागे संघ व्यवस्थापन आणि त्यांनी ठरवून दिलेले नियोजन याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुंतवणुकीमध्येही आपल्या उद्दीष्टपूर्ततेसाठी लागणारे योग्य नियोजन करताना गुंतवणुकदाराचा पैसा, योग्य गुंतवणूक पर्याय व काळानुसार घेतले गेलेले गुंतवणुकीचे निर्णय जेवढे महत्त्वाचे असतात त्यामध्येही आर्थिक सल्लागाराची महत्त्वाची भूमिका असते. संपूर्ण नियोजन व अनुभवी सल्ला आर्थिक उद्दीष्टपूर्ततेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.