म्युच्युअल फंडांची गुंतवणूक वाढली

एसआयपीमुळे गुंतवणुकीचा ओघ कायम

पुणे – परकीय गुंतवणूकदारांवरील अधिभार काढणे आणि कंपनी करातील मोठ्या कपातीमुळे भांडवल बाजारात गुंतवणूक वाढून निर्देशांक विक्रमी पातळीवर गेले आहेत. त्याचबरोबर शेअर बाजारात होणारी म्युच्युअल फंडांची गुंतवणूक वाढू लागली असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये म्युच्युअल फंडांनी शेअर बाजारात 24 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. गेल्या वर्षातील या तिमाहीच्या तुलनेत यामध्ये 35 टक्‍के वाढ झाली आहे. आगामी काळातही गुंतवणूकीला पोषक निर्णय घेण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले असल्यामुळे चांगल्या परताव्याच्या दृष्टिकोनातून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढत आहे.

वाढलेल्या गुंतवणूकीमुळे मुच्युअल फंडाच्या शेअर बाजारासबंधी योजनांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत वाढ होऊन ती आता 7 लाख 24 हजार कोटी रुपये इतकी झाली आहे. एसआयपीद्वारे गुंतवणूकीचा म्युच्युअल फंडाना चांगलाच आधार मिळत आहे.

जुलै-सप्टेंबर या तिमाहीत झालेली 25 टक्‍के म्हणजे जवळपास 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही मोठ्या कंपन्यातील शेअरमध्ये झालेली आहे. कंपनी करात कपात केल्यामुळे या कंपन्यांचा नफा आगामी काळात वाढेल आणि गुंतवणूकदारांना अधिक लाभांश मिळेल असे म्युच्युअल फंड व्यवस्थापकांना वाटते. सरकारी बॅंकाना मिळालेली भांडवली मदत आणि इतर कारणांमुळे आगामी काळात कंपन्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतील, असा विश्‍वास गुंतवणूकदारांना आणि म्युच्युअल फंड व्यवस्थापकांना वाटतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.