पुसेगाव, (प्रतिनिधी)- ‘ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक जगातील सर्वात मोठी गुंतवणूक समजली जाते. त्यामुळे हा उपक्रम चिरकाल टिकून भविष्यवेधी ठरेल.
या अभ्यासिकेच्या माध्यमातून चांगले नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी घडतील,’ असा विश्वास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला.
पुसेगाव येथील श्री सेवागिरी सांस्कृतिक भवनात डी. एन. जाधव फाउंडेशन व श्री सेवागिरी फाउंडेशन संचालित श्री परीक्षा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, माजी कामगार आयुक्त तथा डी. एन. जाधव फाउंडेशनचे चेअरमन सुरेश जाधव, मुंबई एमआयटीएलचे व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर, नगरपालिका प्रशासनाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे,
केंद्रीय महसूल विभागाचे उपायुक्त नासिर मणेर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव वैभव राजेघाटगे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, समीर गोरे, सुधीर घाडगे, शीलादेवी जाधव, अजय जाधव, राजेश देशमुख, सुरेश चव्हाण, चंद्रकांत धुमाळ, रणधीर जाधव, डॉ. सुरेश जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव उपस्थित होते.
मलिकनेर म्हणाले, ‘या अभ्यास केंद्रातून ग्रामीण विद्यार्थ्यांना नवा दृष्टिकोन मिळेल. विद्यार्थ्यांनी उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी उच्च ध्येय आणि दृष्टिकोनासोबत जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची वृत्ती ठेवावी.
नासिर मणेर म्हणाले, ‘माझी जडणघडण याच मातीतील असल्याने या भागातील जास्तीत जास्त मुले अधिकारी होण्यासाठी आणि शहरापेक्षा अधिकच्या सुविधा त्यांना या अभ्यासिकेत मिळाव्यात यासाठी लागेल ती मदत करेन.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करताना योग्य दिशा मिळावी, अशी अपेक्षा सुरेश जाधव यांनी व्यक्त केली.
श्रीधर जाधव यांनी प्रास्ताविक केले. चेअरमन रणधीर जाधव यांनी स्वागत केले. विश्वस्त डॉ. सुरेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. ठाण्याचे उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर यांनी आभार मानले.