देशातील तपासयंत्रणा पूर्वग्रहदूषित – मुश्रीफ

पुणे – “देशातील तपास यंत्रणा मुस्लिम समाजाविषयी दूषित दृष्टीकोन ठेवून एखाद्या गुन्ह्याबद्दल तपास करतात. त्यामुळेच दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट यांसारख्या घटनांमध्ये मुद्दामहून मुस्लिम नागरिकांनाच आरोपी ठरविण्याचा प्रयत्न केला जातो. आजही बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचा आरोप असलेले एका प्रतिष्ठित संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष, तर जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार अजूनही शिक्षेपासून दूर आहेत, त्याचवेळी खोटे पुरावे निर्माण करून अनेक मुस्लिम तरूणांना एखाद्या गुन्ह्यात अडकविण्याचे तपास यंत्रणेचे अनेक प्रयत्न समोर झाले आहेत. त्यामुळेच तपासयंत्रणा या पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप माजी पोलीस अधिकारी एस.एम. मुश्रीफ यांनी मंगळवारी येथे केला.

मुश्रिफ लिखित “हू किल्ड करकरे’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, माजी पोलीस अधिकारी सुधाकर आंबेडकर उपस्थित होते.

ठिपसे म्हणाले, “एक इन्स्पेक्‍टर जनरल या पदाचा व्यक्ती जर तपासयंत्रणांवर प्रश्‍न उपस्थित करत आहे, तर त्याविषयी चर्चा झाली पाहिजे. मुश्रीफ यांनी सादर केलेल्या गोष्टी खोट्या असतील, तर त्या जाणकारांनी खोट्या ठरवल्या पाहिजे, त्याचे खंडन केले पाहिजे. परंतु असे होताना दिसत नाही. त्यामुळेच मुश्रीफ यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी खरेच आहेत, असे वाटते. खोटे पुरावे सादर करून एखाद्या निरपराध व्यक्तीला गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो. मात्र ही गोष्ट समाजाला मान्य नसते. हिंदू संघटनाही बॉम्ब ब्लास्ट करतात हे किती लोक मान्य करतात? मुळात जर तपास यंत्रणा पूर्वग्रहदूषित असतील, कायदे कमकुवत असतील तर देशातील नागरिकांची सुरक्षा करणार कोण? तपास यंत्रणांनी तर्कनिष्ठेने आणि शास्त्रीय पद्धतीने गुन्ह्याचा तपास केला पाहिजे.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.