शहाजहानपुर – बलात्काराच्या आरोपाखाली कारागृहात असलेले वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या समर्थकांनी कारागृहात भेट देऊन तेथील कैद्यांना ब्लॅंकेटचे वाटप केले.
त्यांच्या या कृत्याबद्दल तक्रार दाखल झाली असून त्या प्रकरणाची दोन ते तीन दिवसांत चौकशी पुर्ण करण्यात येईल असे कारागृह उपमहानिरीक्षक आर. एन. पांडे यांनी म्हटले आहे.
स्वत: पांडे यांनी या कारागृहात भेट देऊन या घटनेची सविस्तर चौकशी केली आहे. कारागृहातील अधिक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांचे या संबंधात जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत.
अन्य कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून त्या चौकशीचा अहवाल तुरूंग महानिरीक्षकांकडे पाठवण्यात येणार आहे. आसाराम समर्थकांच्या या कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्याविषयी मोठा वाद निर्माण झाला आहे.