नगर -मंगळवारी संगमनेर तालुक्यात चार करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.20) रात्री उशिरा पुन्हा दोन करोना रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या 68 वर गेली आहे. नगर शहरातील जुना मंगळवार बाजार परिसरात एका रिक्षाचालकास करोनाची लागण झाल्याचे बुधवारी आढळून आले.
या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 12 जणांना आज तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णाच्या अतिजवळच्या दोन व परिसरातील दहा अशा, 12 जणांची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, हा रुग्ण सुभेदारगल्लीतील रुग्णांच्या संपर्कात आला असावा, असा अंदाज आहे. त्याला सर्दी व खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने तो सारीचा रुग्ण म्हणून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्याचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. बुधवारी रात्री उशिरा अहवाल आल्यानंतर त्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी संगमनेर शहरातील रहमतनगर येथील बाधित रुग्णाच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले.